गेल्या काही दिवसांपासून दुचाकीस्वारांचे अपघात वाढलेत. दुचाकीस्वारांवर निर्बंध घालण्यासाठी आता पुन्हा एकदा हेल्मेटसक्ती कडक करण्यात आली आहे. १५ ऑगस्टपासून पुन्हा एकदा नाशिक शहरात हेल्मेट सक्ती लागू करण्यात येणार असल्याने नाशिककरांना आता हेल्मेट घालूनच प्रवास करावा लागणार आहे. कारण आता नाशिक शहर पोलीस आयुक्तांनी अनोखी मोहीम राबवत हेल्मेट सक्ती केली आहे.
“नो हेल्मेट,नो पेट्रोल…” म्हणजे तुमच्याकडे हेल्मेट असेल तरच तुम्हाला गाडीत पेट्रोल भरता येणार आहे. मात्र याला काही नाशिककरांचा विरोध आहे, तर काहींनी मात्र या निर्णयाच स्वागत केलंय. नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दुचाकी चालकांना हेल्मेट घालण्याचे आवाहन केलेय. दुचाकीवरील होणाऱ्या अपघातांची संख्या, त्यात हेल्मेटची गरज लक्षात घेता आयुक्तांचा निर्णय घेतलाय. सर्व पेट्रोल पंप चालकांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत, की एखाद्या दुचाकीस्वाराने हेल्मेट घातले नसेल, तर त्याला इंधन देऊ नये.
विशेष म्हणजे १ जूनपासून हेल्मेटच्या नियमांतही बदल करण्यात आले होते. त्यानुसार १ जूनपासून देशात केवळ ब्रँडेड हेल्मेटचीच विक्री होत आहे. चांगल्या गुणवत्तेच्या ब्रँडेड हेल्मेटच्या विक्रीसाठी आणि आयएसआय प्रमाणित नसलेल्या हेल्मेटची विक्री आणि निर्मिती रोखण्यासाठी नवा कायदा लागू केलाय. नियमांची पायमल्ली करणाऱ्यास १ वर्षाचा तुरुंगवास आणि एक लाख ते पाच लाख रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होणार आहे.
हे ही वाचा:
पूर्व आशियात कोरोनाची तिसरी लाट, भारतालाही धोका?
गणपती बाप्पा मोरया, ‘या’ गणपतीचं दर्शन घ्या
नरेंद्र मोदी करणार ‘हे’ ऐतिहासिक काम
नाशिककरांनी हेल्मेटचा वापर करावा, यासाठी अनेक क्लृप्त्या यापूर्वीही लढविल्या गेल्यात; मात्र तरीही बहुतांश नाशिककरांच्या अजूनही हेल्मेटला गांभीर्यानं घेतलेलं नाही. हेल्मेट डोक्यांवर कमी आणि दुचाकींच्या आरशांवर, तसेच पाठीमागे जास्त अडकविलेले अधिक पाहावयास मिळते. त्यामुळे आता जेव्हा दुचाकी चालविण्यासाठी पेट्रोलच मिळणार नाही, म्हटल्यावर हेल्मेट घालण्याशिवाय नाशिककरांकडे पर्याय नाही.