राज्यातील ठाकरे सरकारने आता कोरोना काळात मोफत शिवभोजन थाळी देण्याची सुरुवात केली होती. परंतु कोरोना आता संपला आहे असे म्हणत, मोफत शिवभोजन थाळी देणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
१ ऑक्टोबरपासून या थाळीसाठी १० रुपये मोजावे लागतील. तसेच पार्सल सुविधा देखील बंद करण्यात आली आहे. पूर्वी शिवभोजन थाळीसाठी १० रुपये मोजावे लागायचे. पण कोरोनाचे संकट सुरू झाल्यानंतर राज्य सरकारने त्याची किंमत कमी केली होती. त्यानंतर, कोरोनाची दुसरी लाट पाहता सरकारने ही प्लेट मोफत देण्यास सुरुवात केली.
नुकताच राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने यासंदर्भात आदेश जारी केला आहे. १ ऑक्टोबरपासून शिवभोजन केंद्रांना दररोज दीडपट थाळी वाटप करण्याचे उद्दिष्ट पूर्वीप्रमाणे केले जाईल. कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या टप्प्यात २९ मार्च २०२० रोजी शिवभोजन थाळीची किंमत १० रुपयांवरून ५ रुपये प्रति करण्यात आली होती. मग कोरोना संकटामुळे, १५ एप्रिल २०२१ पासून, ब्रेक द चेन अंतर्गत, गरीब आणि गरजूंना प्रतिदिन २ लाख शिवभोजन थाळी मोफत दिली जात होती.
शिव भोजन थाळीच्या मोफत वितरणाचा कालावधी १४ सप्टेंबर रोजी संपला आहे. सरकारचे म्हणणे आहे की, राज्यात आता कोरोना आटोक्यात आलेला आहे. त्यामुळेच कोरोना निर्बंधही टप्प्याटप्प्याने शिथिल केले जात आहेत. हे पाहता शिवभोजन थाळीचे दर पूर्वीप्रमाणे १० रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हे ही वाचा:
शिवसेना आमदार आशिष जयस्वालांचा काँग्रेस-राष्ट्रवादीवर निशाणा
डोंबिवलीमधील बलात्कारातील सर्व ३३ आरोपी गजाआड
‘परब यांनी आताच्या पक्षप्रमुखांची शपथ घेतली असती तर…’
दुसरीकडे, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दिवसभर राज्यातील १३२० शिवभोजन केंद्रांवर १ लाख ९० हजार २३० शिवभोजन थाळीचे मोफत वाटप करण्यात आले. म्हणजे हा आकडा पाहता, आजही मोफत शिवभोजन थाळीची निकड आहे हेच दिसून येत आहे. असे असताना ठाकरे सरकारने घेतलेला हा निर्णय म्हणजे पोटावर पाय आणण्यासारखाच आहे.