महाराष्ट्र सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूरमध्ये सुरूवात झाली आहे. नागपूरात शेवटचे हिवाळी अधिवेशन २०१९ मध्ये झाले होते. त्यानंतर कोरोना आणि तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीचे कारण देत दोन वर्ष हिवाळी अधिवेशन नागपूरात झालेलेच नाही. नागपूर पॅक्टनुसार तीन पैकी एक अधिवेशन नागपूरला घ्यावे लागते. मात्र महाविकास आघाडी सरकारला २०१९ नंतर नागपूरमध्ये अधिवेशन घेता आलेले नाही.
या अधिवेशनच्या पहिल्या दिवशी धनगर समाजाकडून वेगवेगळ्या मागण्यांसाठी विधानभवनावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या मोर्चाला टेकडी रोडवर रोखण्यात आले. पोलिसांनी मोर्चा अडवल्यानंतर ५ जणांचे शिष्टमंडळ निवेदन देण्यासाठी जाणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी ठरवले.
हे ही वाचा:
लोकायुक्त कायद्याचे शस्त्र विरोधकांना पेलवेल काय?
अर्जेंटिनाच्या विजयावर अतिउत्साही चाहत्याचा हवेत गोळीबार, एकजण ठार
फडणवीसांचा सवाल, तुम्हाला मंत्रिपद पाहिजे का?
२१ वर्षांनी भारताच्या डोक्यावर चमकला मुकुट
धनगर समाजाच्या या मोर्चात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. रोहित पवार यांनी या मोर्चात सामील होण्याचा प्रयत्न करताच धनगर समाजाचे कार्यकर्ते भडकल्याचे चित्र दिसले. रोहित पवारांसमोरच धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीला सुरूवात केली. त्यानंतर पोलिसांनी रोहित पवारांना गर्दीतून बाहेर काढले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी रोहित पवारांची भेट घेतली. परंतु त्यांना मंचावर नो एण्ट्री होती. चर्चा करताना आंदोलकांनी तुम्हाला इथे कुणी बोलावलं? असा प्रश्नही उपस्थित केला.
व्यासपीठावर येऊ न दिल्यामुळे कोणी राजकारण करू नये. त्यांनी जी भूमिका घेतली ती योग्य आहे. लोकांचा विचार करून हे प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत, असे रोहित पवार म्हणाले.
दरम्यान धनगर समाजाचे मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. दत्तात्रय भरणेंच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत मुद्दे पोहोचले होते, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.