दोन लसी घेतलेल्यांचे ‘तिकीट कापले’

दोन लसी घेतलेल्यांचे ‘तिकीट कापले’

येत्या १५ ऑगस्टपासून दुसरा डोस घेऊन १४ दिवस झालेल्या मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी पास देण्यात येणार असून पासधारकांनाच प्रवास करता येणार आहे. त्यामुळे आता लोकलप्रवास कसा करायचा असा प्रश्न दोन लसी घेणाऱ्यांपुढे आहे.

राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाच लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. त्यासोबतच दुसरा डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झाल्याची अट घालण्यात आली आहे.

या अशा नियमावलीमुळे लाखो मुंबईकर आणि आसपासच्या ठिकाणाहून मुंबईत ये-जा करणाऱ्या प्रवाशांना लोकल प्रवासाची परवानगी मिळूनही प्रवासापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्याशिवाय, दोन डोस झाल्यानंतर देखील फक्त महिन्याचा पास घेतलेल्या व्यक्तींनाच लोकलमधून प्रवास करता येणार आहे. त्यामुळे तिकीट न घेता अशा पात्र प्रवाशांना थेट महिन्याचा पासच काढावा लागणार आहे.

एकीकडे मुंबई लोकलमधून सर्वसामान्यांना प्रवास करण्याची मुभा मिळाल्यामुळे दिलासा मिळाल्याचं चित्र निर्माण झालेलं असताना त्यातल्या अटींमुळे आणि लसीकरणाच्या आकडेवारीमुळे मुळात लाखो प्रवासी लोकल प्रवासापासून वंचितच राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आलेल्या प्रवाशांची संख्या कमीच असल्यामुळे या परवानगीचा लाभ देखील तुलनेनं कमी प्रवाशांना मिळणार आहे.

एकीकडे लसीकरणाचा संथ वेग आणि कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवल्यामुळे दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या मुळातच कमी आहे. शिवाय, यामध्ये ४५ वरच्या नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे १८ ते ४४ या सर्वाधिक प्रवास करणाऱ्या गटाला प्रवासाच्या परवानगीचा फायदा फारच कमी होणार आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची ट्विटर खाती लॉक

ठाकरे सरकारची गोंधळवृत्ती; शिष्यवृत्ती परीक्षा फक्त मुंबईत रद्द

फी कपातीच्या विषयात ठाकरे सरकारची पळवाट, अध्यादेश ऐवजी शासकीय आदेश

‘शेरशाह’ कॅप्टन विक्रम बात्राच्या कुटुंबियांना दिला हा सन्मान

दुसरीकडे ४५ वरच्या व्यक्तींना देखील दोन डोस पूर्ण होऊन देखील तिकीट न मिळता थेट महिन्याभराचा पास काढावा लागणार आहे. त्यामुळे महिन्यातून फक्त काही दिवस किंवा क्वचित महत्त्वाच्या कामासाठी जाणाऱ्या लोकांना देखील दोन डोस पूर्ण होऊनही पूर्ण महिन्याचा पास काढावा लागेल. संथ लसीकरणामुळे अनेक ठिकाणी एक डोस घेतलेल्या लोकांची संख्या जास्त आहे. विशेषत: कल्याणपुढे कर्जत कसारा अशा ग्रामीण भागामध्ये त्यामुळे या ठिकाणी एक डोस घेतलेल्यांना परवानगीची मागणी केली जात आहे.

Exit mobile version