डबेवाल्यांच्या व्यवस्थापनाची महती विदेशातही पोहोचली असून निरनिराळ्या देशांमधून मुंबई भेटीसाठी येणारे पर्यटक आवर्जून डबेवाल्यांची भेट घेत असतात. महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेने मुंबईत डबेवाला भवन उभारण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सध्या तरी असे भवन उभे राहणे शक्य नसल्याचे दिसत आहे.
महापालिका प्रशासनाने तशी माहिती महासभेत सादर केली आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला डबेवाल्यांच्या पदरी केवळ निराशाच आलेली आहे. मुंबईत मध्यवर्ती ठिकाणी ‘डबेवाला भवन’ उभारण्यात यावे, अशी मागणी करणारी ठरावाची सूचना शिवसेना नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी पालिका सभागृहात त्यावेळी मांडली होती. परंतु चार वर्षे उलटून गेल्यानंतरही डब्बेवाला भवन काही उभारले गेले नाही.
महत्त्वाचे म्हणजे महापालिकेच्या अर्थसंकल्पातही भवनासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली होती.
महानगरपालिकेने नुकत्याच दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबई शहरात ‘डबेवाला भवन’ उभारण्यासाठी जमीन उपलब्ध नाही. सध्या त्यांच्याकडे इस्टेट विभागाकडे कोणतीही जमीन उपलब्ध नाही असे कारण आता महापालिकेने दिलेले आहे. डब्बेवाला भवनाचे बजेट २०२१-२२ च्या इक्बाल सिंह चहल यांच्या बजेट भाषणात घोषित केले गेले होते. हे बजेट १ कोटी रुपये इतके होते. संपूर्ण शहरात २ लाखांहून अधिक डबेवाले आहेत. त्यांचे व्यवस्थापन कौशल्य हे कल्पनेच्या पलीकडचे आहे. केवळ मुंबई शहरातच नाही तर डबेवाल्यांनी जगभरातून वाहवा मिळवली आहे.
हे ही वाचा:
जर्मन निवडणुकीनंतर चित्र अस्पष्टच?
परमबीर यांच्यासह २५ जणांना निलंबित करण्याचा प्रस्तावच फेटाळला
किरीट सोमैय्यांचा कोल्हापूर दौरा आज सुरु, काय होणार कागलमध्ये?
तालिबानी फतवा; दाढी कापू नका, विदेशी हेअरस्टाइल नको!
डबेवाला भवन उभारण्यासाठी विविध पर्यायांवर तीन वेळा चर्चा झाली. मात्र प्रशासनाने अद्याप होकार दिलेला नाही. प्रशासनाने सप्टेंबर महिन्याच्या महासभेच्या पटलावर सादर केलेल्या लेखी माहितीनुसार सध्या अनारक्षित भूखंड उपलब्ध नाही हे असेच कारण दिलेले आहे.