फ्रान्समध्ये रंगात असलेली पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्ती खेळात वजन जास्त असल्याने भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट ही अपात्र ठरली आहे. यामुळे तिची पदकाची संधी हुकली असून तिनेही कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली. या प्रकरणाचे पडसाद भारतात राजकीय स्तरावर उमटत असून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना यावरून लक्ष्य केले जात आहे.
विनेश फोगाट हिने निवृत्ती जाहीर करताच भारतीय चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. या प्रकरणावर विनेश फोगाट हिची बहिण बबिता फोगाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विनेश हिच्या निवृत्तीच्या निर्णयामुळे दुःख झाल्याचे त्या म्हणाल्या. विनेशसोबत कट रचल्याच्या आरोपांवर बबिता म्हणाल्या की, “विनेशसोबत कोणताही कट रचलेला नाही. २०१२ मी स्वतः २०० ग्रॅम जास्त वजनामुळे अपात्र झाले होते. यामुळे आशियाई चॅम्पियनशिप खेळू शकले नाही. यापूर्वीही अनेक खेळाडू जास्त वजनामुळे स्पर्धेबाहेर पडले आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारचे षडयंत्र नाही,” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे.
तसेच बबिता फोगटने सांगितले की, ‘विनेशने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे. केवळ मी आणि माझे कुटुंबच नाही तर संपूर्ण देश याने दुःखी आहे. आम्ही विनेशला धीर देऊ की आम्ही सगळे तिच्या पाठीशी उभे आहोत. आम्ही तिच्याशी बोलून तिला पुन्हा मैदानात आणू आणि २०२८ ऑलिम्पिक खेळण्यासाठी धैर्य देऊ.”
विनेशला राज्यसभेची उमेदवारी देण्याच्या भूपेंद्र हुड्डा यांच्या वक्तव्यावर बबिता फोगाट म्हणाल्या की, “मी हुड्डाजींना सांगू इच्छिते की, तुम्ही तुमच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात किती खेळाडूंना राज्यसभेवर पाठवले? मी भूपेंद्र हुड्डा आणि दीपेंद्र हुड्डा या दोघांना हात जोडून विनंती करते की तुम्ही हे कुटुंब तोडणे थांबवा. कुटुंबाचे राजकारण करू नका. राजकारण करायचे असेल तर मैदानात जाऊन करा, हे कुटुंब तोडून राजकारण करू नका.”
हे ही वाचा:
दिल्ली दरबारी जाऊन, भजन, पाद्यपूजन करून चरणामृत घेऊन आले, परंतु कटोरा रिकामाच !
होर्डिंग कोसळल्याची दुर्घटना ‘देवाचे कृत्य’; भावेश भिंडेचा दावा फेटाळला
‘बांगलादेशात कट्टरवाद्यांमुळे स्मशानभूमीही शिल्लक नाहीत’
‘महाराष्ट्रातील जनतेने उबाठाची लाचारी बघितली’
विनेश फोगाटला बुधवारी पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र घोषित करण्यात आले. प्रत्यक्षात बुधवारी विनेशचे वजन तिच्या निर्धारित ५० किलोच्या श्रेणीपेक्षा केवळ १०० ग्रॅम अधिक असल्याचे आढळून आले. यानंतर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये वजन जास्त असल्याने अपात्र ठरलेली भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट हिने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.