होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय पुणे शहरासाठी बंधनकारक नाही. म्हणजेच ज्यांच्या घरी राहण्याची व्यवस्था आहे, अशा रुग्णांना कोव्हिड सेंटरला जाण्याची गरज नाही, अशी माहिती पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कालच होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय जाहीर केला होता.
पुणे शहरात ज्यांच्या घरी राहण्याची व्यवस्था आहे, अशा कोरोनाग्रस्त रुग्णांना कोव्हिड सेंटरला जाण्याची गरज नाही. राज्य सरकारचा आदेश अजून प्राप्त झालेला नाही, मात्र शासन प्रत आल्यावर निर्णय घेऊ. तरी शहरात कोव्हिड सेंटरला जाणं बंधनकारक नसल्याचं राज्य आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी महापालिकेला सांगितलं आहे, अशी माहिती रुबल अग्रवाल यांनी दिली.
अनेक कोरोना रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असतानाही सुप्रर स्प्रेडर म्हणून फिरत आहेत. त्यामुळे अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने १८ जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन बंद केलं आहे. त्या जिल्ह्यांची यादीही जारी केली आहे.
हे ही वाचा:
३८ वर्षांनी कल्याणकर घेणार मोकळा श्वास
ठाकरे सरकार दोन तोंडांनी बोलतय
अनेक महिने महाराष्ट्रात लॉकडाऊन ठेवणार का?
शिवसेना नेत्याने लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवले
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच १८ जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीला आरोग्य मंत्री राजेश टोपेही उपस्थित होते. बैठकीनंतर टोपे यांनी मीडियाशी संवाद साधून बैठकीतील निर्णयाची माहिती दिली. “राज्यात होम आयसोलेशन पूर्णपणे बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोविड सेंटरची संख्या वाढवून तिथेच रुग्णांना ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी कोविड सेंटरची संख्या वाढवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. असं केल्याने सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही. तसेच सौम्य लक्षणे असेलेल रुग्ण सुपर स्प्रेडर बनून बाहेर फिरत असतात. त्यालाही आळा बसेल” असं टोपे यांनी सांगितलं होतं.