इंडियन प्रीमिअर लीगच्या २०२३च्या हंगामात पुन्हा एकदा महेंद्रसिंह धोनीच्या संघाने कमाल केली आहे. मंगळवारी खेळल्या गेलेल्या उपांत्य सामन्यात चेन्नईने गुजरातचा १५ धावांनी पराभव केला. या विजयासह धोनीच्या चेन्नई संघाने तब्बल १०वेळा आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे.
गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा धोनीनेही नाणेफेक जिंकली असती, तर पहिली गोलंदाजी करण्यालाच पसंती दिली असती, असे म्हटले होते.
दर्शनची एक चूक महागात
गुजरात आणि चेन्नईमध्ये सुरुवातीपासूनच चुरशीचा सामना सुरू होता. मात्र गुजरातचा नवा गोलंदाज दर्शन नालकडून एक चूक झाली. या चुकीची शिक्षा संपूर्ण संघालाच भोगावी लागली. ही चूक चेन्नईच्या फलंदाजीदरम्यान घडली. खरे तर नाणेफेक हरून पहिल्यांदा फलंदाजी घेतल्यानंतर चेन्नईची सुरुवात फारशी चांगली झाली नाही.
या हंगामातील आपला पहिला सामना खेळणाऱ्या दर्शनने दुसऱ्या षटकात पहिला बळी घेतला होता. दर्शनच्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर चेन्नईच्या ऋतुराज गायकवाड झेलबाद झाला. तेव्हा गुजरातचा संघ जल्लोष करत असतानाच पंचांनी तो ‘नो बॉल’ घोषित करून धक्का दिला. तेव्हा ऋतुराज दोन धावांवर खेळत होता. या मिळालेल्या जीवदानाचा पुरेपूर फायदा उठवून ऋतुराजने ४४ चेंडूंमध्ये ६० धावांची जबरदस्त खेळी केली. चेन्नईच्या पाच धावा असताना त्यांना पहिला बळी मिळू शकला असता, मात्र चेन्नईच्या सलामीच्या फलंदाजांनी ८७ धावांची भागिदारी रचली.
हे ही वाचा:
ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अल्बानीस म्हणाले, मोदी म्हणजे ‘द बॉस’
आदित्य ठाकरेंना लोकशाही का दिसत नाही?
लोकसभेच्या जागावाटपातही सूडाचा निकष…
कंटेनरचा ब्रेक फेल, सहा कारना धडक, १ ठार
धोनीची रणनीतीही कारणीभूत
जेव्हा गुजरातचा संघ १७३ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा त्यांनी सावध सुरुवात केली. पाच षटकांत गुजरातने एक गडी गमावून ३९ धावा केल्या होत्या. त्यानंतर धोनीने सलग सहा षटके स्पिनर महीश तीक्षणा आणि रवींद्र जडेजा यांना दिली. त्यामुळे गुजरातला तेव्हा दोन गडी गमावून ४१ धावाच करता आल्या. गुजरातवर धावांची गती वाढवण्याचा ताण कायम राहिला आणि धावा करण्याच्या प्रयत्नात त्यांचे एकेक गडी बाद होत गेले. जडेजाने १८ धावा देऊन दोन गडी बाद केले तर, तीक्षणाने २८ धावा देऊन दोन बळी घेतले आणि गुजरातचा १५ धावांनी पराभव झाला.