जनता दल युनायटेडचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी अखेर रविवारी सायंकाळी बिहारच्या पाटणा येथील राजभवनात विक्रमी नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याचवेळी भारतीय जनता पक्षाचे सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण केली. नितीश कुमार यांच्याबरोबर जनता दल युनायटेडचे नेते विजय कुमार चौधरी, बिजेंद्र प्रसाद यादव आणि श्रवण कुमार यांनीही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
डॉ प्रेम कुमार, हिंदुस्थानी अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष) अध्यक्ष डॉ संतोष कुमार सुमन आणि अपक्ष आमदार सुमित कुमार सिंह यांनीही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. रविवारी सकाळी नितीश कुमार यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राजभवनात राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांना दिला होता. त्यांनी सकाळीच जनता दल युनायटेड विधिमंडळाच्या बैठकीत राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यांच्या या राजीनाम्यानंतर तातडीने भाजपने आपल्या आमदारांची बैठक घेतली. आणि नितीश कुमार यांना पाठींबा देणार असल्याचे पत्र दिले.
हेही वाचा..
विंडीजच्या जोसेफने घेतले ७ बळी, गॅबावर ऑस्ट्रेलियाला केले पराभूत
चांदीच्या झाडूने केली जाणार प्रभू राम मंदिराच्या गर्भगृहाची स्वच्छता!
बिहारच्या उपमुख्यमंत्रीपदी सम्राट चौधरी, विजय सिन्हा यांची वर्णी
एनआयएने फरार दहशतवाद्याचे लावले पोस्टर, ५ लाखांचे बक्षीसही जाहीर!
राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार पत्रकारांशी बोलताना म्हणाले, आपण राज्यपालांना बिहारमधील महागठबंधन युती विसर्जित करण्यास सांगितले आहे. लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) आणि काँग्रेससह तीन डाव्या पक्षांचा समावेश असलेल्या महागठबंधन युतीमधील परिस्थिती ठीक नसल्यामुळे राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. या आघाडीत अनेक गोष्टी बरोबर होत नसल्यामुळे अनेक दिवसांपासून कोणत्याही गोष्टींवर आपण भाष्य केले नाही. आपण आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसह सर्वांची मते आणि सूचना जाणून घेत होतो. आज त्या सर्वांचे म्हणणे मी ऐकून घेतले आणि राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे नितीश कुमार यांनी सांगितले.