नितीन गडकरी यांची मल्लिकार्जुन खर्गे, जयराम रमेश यंना कायदेशीर नोटीस!

तीन दिवसांत लेखी माफीची मागणी

नितीन गडकरी यांची मल्लिकार्जुन खर्गे, जयराम रमेश यंना कायदेशीर नोटीस!

काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ‘एक्स’ अकाऊंटवर मानहानीकारक मजकूर प्रदर्शित केल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि सरचिटणीस जयराम रमेश यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. गडकरी यांच्या मुलाखतीचा विपर्यास करण्यात आला, असा दावा या नोटिशीत करण्यात आला आहे. काँग्रेसनेत्यांनी गोंधळ, खळबळ आणि बदनामी निर्माण करण्याच्या एकमेव आणि सुप्त हेतूने हे कृत्य केले, असा आरोप गडकरी यांच्या वकिलाने केला आहे.

‘माझ्या अशिलाची मुलाखतीला विकृत वळण देऊन ती तुमच्या ‘एक्स’ हँडलवर सादर करण्यात आली आहे. निवडक हिंद वाक्य घेऊन हे जाणीवपूर्वक केले गेले आहे,’ असे त्यांच्या वकिलाने नोटिशीमध्ये लिहिले आहे. गडकरी यांनी एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीतून १९ सेकंदांची व्हिडिओ क्लिप काढण्यात आल्याचे पाहून भाजप नेते हादरले, असे गडकरी यांचे वकील बालेंदू शेखर यांनी सांगितले. या क्लिपमध्ये त्यांच्या शब्दांचा संदर्भ आणि अर्थ लपवण्यात आला आहे.
नितीन गडकरी यांनी ‘द लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीतून ही क्लिप काढण्यात आली आहे. काँग्रेसने मंत्री नितीन गडकरी यांच्यावर क्लिप पोस्ट केली. ‘आज गावांतील मजूर, शेतकरी नाखूष आहेत. गावांमध्ये रस्ते, पिण्याचे पाणी, चांगली रुग्णालये आणि शाळा नाहीत,’ असे गडकरी यात म्हणताना दिसत आहेत.

हे ही वाचा:

भारताला भेट देण्यासाठी आलेल्या स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार!

गौतम गंभीरचा राजकारणाला राम राम!

बेंगळुरूतील कॅफेमध्ये स्फोट; आयईडी स्फोटके पेरणारा सीसीटीव्हीमध्ये कैद

भाजपचा अँग्री यंग मॅन अण्णामलाई यांचे लोकसभेत आगमन होण्याची शक्यता

नितीन गडकरी यांच्या वकिलांनी सांगितले की, काँग्रेसचे दोन सर्वात प्रभावशाली नेते खरगे आणि रमेश यांना त्या टीकेचा संदर्भ माहीत होता. गडकरी हे नरेंद्र मोदी सरकारच्या देशात विकास घडवून आणण्याच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत होते. मात्र गडकरी यांच्या प्रतिष्ठेला बदनाम करण्यासाठी हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
जनतेच्या दृष्टीने, तसेच आपल्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली आगामी सार्वत्रिक निवडणुकीत लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी सज्ज असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या एकजुटीत फूट आणि दरी निर्माण करण्याचा हा निरर्थक प्रयत्न आहे, असे काँग्रेसनेत्यांना पाठवलेल्या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.

तसेच, या संदर्भात गडकरी यांनी खर्गे आणि जयराम रमेश यांच्याकडून लेखी माफी मागितली आहे. ‘एक्स’वरून व्हिडिओ काढून टाकण्याची आणि तीन दिवसांत लेखी माफी मागण्याची मागणी नितीन गडकरी यांनी केली आहे. तसेच, तातडीने तो व्हिडीओ तुमच्या पोस्टवरून काढून टाकावा, अशी मागणीही केली आहे. ही नोटीस मिळाल्यानंतर तीन दिवसांच्या आत माझ्या अशिलाची लेखी माफी न मागितल्यास दिवाणी आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे दोन्ही पर्याय आमच्यासमोर खुले आहे, असेही या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.

Exit mobile version