सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यांनी त्यांच्या कर्जतमधील एन. डी. स्टुडिओमध्ये त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. नितीन देसाई यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये कला दिग्दर्शनाचं काम केलं. त्यांच्या निधनामुळे हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त करण्यात येत आहे. नितीन देसाई हे ५८ वर्षांचे होते.
नितीन देसाई यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या स्टुडीओतील कर्मचाऱ्यांना देसाई यांनी आत्महत्या केल्याचं कळल्यानंतर त्यांनी लगेचच स्थानिक पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. त्यानुसार पोलीस पुढील कारवाई करत आहेत. मात्र, नितिन देसाई यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
कर्जतमधील एन. डी. स्टुडीओ हे नितीन देसाई यांचे दुसरे घर होते असं मानलं जात होतं. आत्महत्येच्या आधी दोन दिवसांपासून ते स्टुडीओमध्येच होते. कालपर्यंत आपल्या टीमला त्यांनी येणाऱ्या प्रोजेक्टबद्दल माहिती दिली होती. पण, सकाळपासूनच त्यांनी कोणाचाही फोन उचलला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी एन. डी. स्टुडीओच्या अधिकाऱ्यांना याबद्दल कळवलं. त्यानंतर त्यांनी दरवाजा तोडला आणि पोलिसांना याबद्दल माहिती दिली.
हे ही वाचा:
मणिपूर हिंसाचाराचा अर्थव्यवस्थेवर परिणाम; जीएसटी संकलनात घट
इन्स्टाग्रामवर झाली ओळख अन् साडेसहा लाखाला घातला गंडा !
आयटीआयमध्ये ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बांबू शिल्प प्रशिक्षण’
चांद्रयान- ३ गेले पृथ्वीच्या कक्षेबाहेर
नितीन देसाईंची कारकीर्द
नितीन देसाई यांनी अनेक हिट हिंदी सिनेमांचे सेट उभारले होते. ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’, ‘लगान’, ‘माचिस’, ‘जोधा अकबर’ अशा अनेक सुपरहिट सिनेमांचे त्यांनी कला दिग्दर्शन केले होते. ८० च्या दशकात नितीन देसाई यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली होती. अनेक ऐतिहासिक मालिका आणि महानाट्यांसाठीही नितीन देसाई यांनी उभारलेले सेट प्रचंड चर्चेचा विषय ठरले होते. दरम्यान, नितीन देसाई यांना त्यांच्या उत्तुंग कारकिर्दीमध्ये चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्याशिवाय, त्यांना फिल्म फेअर पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं आहे.