नितेश राणेंनी मागितला उद्धव ठाकरेंचा राजीनामा! मनोहर जोशींची आठवण करून देत म्हणाले…

नितेश राणेंनी मागितला उद्धव ठाकरेंचा राजीनामा! मनोहर जोशींची आठवण करून देत म्हणाले…

महाराष्ट्रात कालपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर हे चांगलेच चर्चेत आले आहेत. सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी मार्फत मंगळवार २२ मार्च रोजी श्रीधर पाटणकर यांच्या अकरा सदनिका जप्त करण्यात आल्या. यावरूनच महाराष्ट्रातील ठाकरे सरकार आणि सत्ताधारी शिवसेनेवर टीका होताना दिसत आहे. भाजपा नेते आमदार नितेश राणे यांनी इतिहासातील एका घटनेचा हवाला देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

नितेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा मागितला नसला तरीदेखील त्यांनी मनोहर जोशी मुख्यमंत्री असतानाचा एक प्रसंग ट्विटमध्ये सांगितला आहे. नितेश राणे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, “इतिहास असे सांगतो की मनोहर जोशीजी यांच्या जावयावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले म्हणून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना राजीनामा देण्यास सांगितला होता. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. इथे ही तोच नियम लागू होणार की शिवसैनिकांसाठी नियम वेगळे आहेत?” असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे.

हे ही वाचा:

पाटणकर प्रकरणातल्या पुष्पक बुलियनने नोटाबंदीत केली २८५ किलो सोने खरेदी

तृणमूल नेत्याच्या हत्येनंतर प. बंगालमध्ये १० जणांना जिवंत जाळलं 

‘उ. प्रदेशमधील पराभवासाठी प्रियांका गांधींचा राजीनामा घ्या’

देवभूमीत आजपासून पुष्करराज

नितेश राणे यांचे हे ट्विट सध्या चांगलीच चर्चेत असून त्यामुळे नवा वाद होण्याची शक्यता आहे. मनोहर जोशी यांनी राजीनामा दिल्यानंतर नितेश राणे यांचे वडील विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते.

दरम्यान श्रीधर पाटणकर यांच्यावर करण्यात आलेली कारवाई चांगलीच चर्चेत असून ठाण्यातील निलांबरी प्रकल्पात असलेल्या त्यांच्या अकरा स्थानिकांवर ईडी मार्फत जप्ती आणण्यात आली आहे. या सदनिकांची किंमत ६ कोटी ४५ लाख रुपये असल्याचे म्हटले जाते. ईडी तपास करत असलेल्या पुष्पक बुलियन प्रकरणाशी संबंधित ही कारवाई करण्यात आली आहे. श्रीधर पाटणकर यांच्या मालकीच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. या कंपनीशी ३० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा व्यवहार झाल्याचे ‘ईडी’च्या निदर्शनास आले. त्यानंतर या कंपनीच्या मालकीच्या मालमत्तेवर टाच आणण्यात आली.

Exit mobile version