निषाद कुमारची २.०४ मीटर ‘उंच उडी’ मारत रौप्य पदकाला गवसणी

पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धेत भारताला मिळाले सातवे पदक

निषाद कुमारची २.०४ मीटर ‘उंच उडी’ मारत रौप्य पदकाला गवसणी

पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धेत भारताची यशस्वी घौडदौड सुरू असून भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर पडली आहे. उंच उडी स्पर्धेत भारताच्या खात्यात रौप्य पदकाची भर पडली आहे. पुरुषांच्या टी-४७ उंच उडी स्पर्धेत निषाद कुमारने ही जबरदस्त कामगिरी केली आहे. निषाद कुमारने अंतिम फेरीत २.०४ मीटर लांब उडी मारून दुसरे स्थान पटकावले. तर, भारताचा राम पाल हा सुद्धा याच स्पर्धेत सहभागी झाला होता. त्याने १.९५ मीटर उंच उडी मारत सातवा क्रमांक मिळवला.

रविवार, १ सप्टेंबर रोजी रात्री टी-४७ श्रेणीतील उंच उडीपटू निषाद कुमार याने आपल्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर रौप्य पदकाची कमाई केली. भारतीय ऍथलीट निषाद कुमारने पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये २.०४ मीटर उंच उडी मारत भारताला सातवे पदक जिंकून दिले आहे. आता या पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात एक सुवर्ण पदक, दोन रौप्य पदके आणि चार कांस्य पदके आहेत. निषाद कुमारने टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेतही रौप्य पदक जिंकले होते. त्याने टोकियोमध्ये २.०६ मीटर उडी मारली होती. टी-४७ हे अशा स्पर्धकांसाठी आहे ज्यांच्या कोपर किंवा मनगटाचा खालील भाग नाही किंवा इजा झाली आहे.

हे ही वाचा:

पॅरालिम्पिकमध्ये प्रीती पालने पटकावले आणखी एक कांस्य पदक

ममता दीदी भेट देईनात, टीएमसी प्रदेशाध्यक्षाचा राजीनामा

आप आमदार अमानतुल्ला खान यांच्या घरावर ईडीचा छापा

बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव यांच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाची तुलना तरी होईल का?

हिमाचल प्रदेशातील अम्बजवळील बदाऊन गावात निषाद कुमार याचा जन्म झाला असून त्याला भारतीय सैन्यात भरती व्हायचे होते. निषाद हा आपले वडील शेतकरी रशपाल सिंग यांना शेतीत कामात मदत करायचा. पण २००७ मध्ये चारा कापण्याच्या यंत्रात त्याचा हात कापला गेला. तरीही त्याला सैन्यात जायचे होते. त्याची मेहनत त्याने सुरू ठेवली आणि आता थेट पॅरालिम्पिकमध्ये दोन पदके भारताच्या नावे केली. प्रशिक्षक रमेश यांनी २००९ मध्ये निषाद कुमारला ऍथलेटिक्सची ओळख करून दिली. यानंतर त्याने त्याची अविरत मेहनत सुरू ठेवली. २०१७ मध्ये, निषाद प्रशिक्षक नसीम अहमद यांच्या हाताखाली प्रशिक्षण घेण्यासाठी पंचकुला येथे पोहोचला. नसीम अहमद यांनी एकेकाळी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते नीरज चोप्रा आणि विक्रम चौधरी यांना प्रशिक्षण दिले होते.

Exit mobile version