नीरज चोप्राचा ‘पॅरिसस्पर्श’; जागतिक स्पर्धेतून ऑलिम्पिकसाठी पात्र

८८.७७ मीटर भालाफेक करत अंतिम फेरीत धडक

नीरज चोप्राचा ‘पॅरिसस्पर्श’; जागतिक स्पर्धेतून ऑलिम्पिकसाठी पात्र

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला भालाफेकमधील पहिले सुवर्ण जिंकून देणारा भालाफेकपटू नीरज चोप्राने २०२४च्या पॅरीस ऑलिम्पिकमधील आपला प्रवेश निश्चित केला आहे. जागतिक अजिंक्यपद ऍथलेटिक्समध्ये त्याने ८८.७७ मीटर भालाफेक करत अंतिम फेरीत धडक मारली आणि ऑलिम्पिकमधील प्रवेशही निश्चित केला.

बुडापेस्ट, हंगेरी येथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद ऍथलेटिक्स स्पर्धेत ऑलिम्पिक पात्रतेसाठी एका थ्रोची गरज होती. त्याप्रमाणे नीरजने ८८.७७ मीटरची फेक केली. या हंगामातील ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. पहिल्याच प्रयत्नात नीरजने ही फेक केली. पुरुषांच्या भालाफेक प्रकारात तो १७व्या क्रमांकावर खेळायला आला. जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी किमान ८३ मीटरची फेक करणे आवश्यक होते.

निळ्या रंगाच्या जर्सीत मैदानात अवतरलेल्या नीरजने आपल्या पहिल्याच भालाफेकीत हा निकष पार केला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य जिंकणारा जाकुब वाडलेच याच्या नावावर सध्या हंगामातील सर्वोच्च कामगिरी आहे. त्याने ८९.५१ मीटर इतकी फेक केलेली आहे.   नीरज चोप्राने या कामगिरीसह जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीतही धडक मारली. ऑलिम्पिकसाठी पात्रतेचा निकष होता ८५.५० मीटर. ती मर्यादाही त्याने सहज पार केली. १ जुलैपासून ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याची संधी खुली झाली आहे. नीरजची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी आहे ८९.९४ मीटर.

हे ही वाचा:

चंद्रावर कसं उतरलं प्रज्ञान रोव्हर?

इस्रोचे पुढील लक्ष्य ‘आदित्य -एल १’

मध्य प्रदेशात ‘हिंदुत्वा’च्या अजेंड्यामुळे काँग्रेसमध्ये कलह

मोदी-शी जिनपिंग ब्रिक्स परिषदेत एकमेकांना भेटले

नीरजसह या स्पर्धेत सहभागी झालेला भारताचा आणखी एक खेळाडू डीपी मनू याने तिसरा क्रमांक मिळविला. त्याने ८१.३१ मीटर इतकी फेक केली. पण त्याला अंतिम फेरीत पात्र होण्यासाठी ग्रुप बी पात्रता फेरीची प्रतीक्षा करावी लागेल. जे खेळाडू अ आणि ब गटातून ८३ मीटरपेक्षा अधिक कामगिरी करतील ते १२ खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.

 

जर्मनीचा ज्युलियन वेबरने ८२.३९ मीटर फेक करत दुसरे स्थान मिळविले. गतविजेता अँडरसन पीटर्स याला मात्र अद्याप सूर सापडलेला नाही. त्याने ७८.४९ मीटर फेक केली. केनियाकडून २०१५मध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या ज्युलियस येगोला मात्र आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. त्याने ७८.४२ मीटर इतकी फेक केली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी नीरजला ८३ मीटर इतकी कामगिरी करण्याची गरज होती. तेव्हादेखील त्याने पहिल्याच प्रयत्नात ८६.६५ मीटर इतकी कामगिरी करत अंतिम फेरी गाठली होती. अंतिम फेरीत त्याने ८७.५८ मीटर फेक करून सुवर्ण जिंकले होते.

Exit mobile version