केनियाचे संरक्षण प्रमुख फ्रान्सिस ओमोंडी ओगोला यांचा गुरुवारी हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. त्यांच्यासह हेलिकॉप्टरमधील नऊ जणांनीही जीव गमवला. केनियाचे राष्ट्रपती व्हिलियम रुटो यांनी या घटनेसंदर्भात माहिती दिली. केनियाचे संरक्षण प्रमुख आणि अन्य नऊ अधिकाऱ्यांचा गुरुवारी देशातील एका दुर्गम ठिकाणी झालेल्या लष्करी हेलिकॉप्टरच्या दुर्घटनेत मृत्यू झाला, असे रुटो यांनी सांगितले.
‘आज दुपारी दोन वाजून २० मिनिटांनी आपल्या देशाला एका दुःखद घटनेचा सामना करावा लागला. केनिया संरक्षण दलाचे (सीडीएफ) प्रमुख फ्रान्सिस ओमोंडी ओगोला यांच्या निधनाचे वृत्त देताना मला अतीव दुःख होत आहे,’ असे राष्ट्रपती रुटो यांनी सांगितले.६१ वर्षीय ओगोला एक प्रशिक्षित लढाऊ वैमानिक होते. ते केवळ एकच वर्ष या पदावर होते. मात्र लवकरच त्यांची लष्करी सेवेतील ४० वर्षे पूर्ण होणार होती. राजधानी नैरोबीपासून सुमारे ४०० किमी दूर उत्तर-पश्चिम परिसरात एल्गेयो माराक्वेट काऊंटीमध्ये ही दुर्घटना झाली. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी हवाई लदाने एक चौकशी पथक पाठवले असल्याचे रुटो यांनी सांगितले.
हे ही वाचा:
मोदींच्या तिसऱ्या पर्वात एक-दोन वर्षांत नक्षलवादाचा नायनाट करू
पट्टा-काठीने मारहाण, तोंडात फेव्हीकॉल, जखमांवर मीठ…महिलेवर अत्याचार, लव्ह जिहादचा संशय
इराणने जप्त केलेल्या इस्रायली जहाजावरील भारतीय डेक कॅडेट सुखरूप परतली मायदेशी
पक्षांना निधी पुरवठा करण्यासाठी राष्ट्रीय निधीचा पर्याय
ओगोला यांच्या हेलिकॉप्टरने चेसेगॉन गावातून उड्डाण केल्यानंतर लगेचच दुर्घटनाग्रस्त झाले. केनियन सैनिक आणि अन्य ठिकाणांची पाहणी करण्यासाठी काही ठिकाणी थांबल्यानंतर ते एका शाळेचा दौरा करत होते. राष्ट्रपतींनी दुर्घटनेची माहिती कळताच राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची तत्काळ बैठक बोलावली होती. या दुर्घटनेत संरक्षण प्रमुखांसह त्यातील नऊ अन्य अधिकारीही मारले गेले. तर, दोघांचा जीव बचावला.