रायगड जिल्ह्यातील नवीन पनवेल शहरातील रुग्णालयात एक लिफ्ट कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत नऊ डॉक्टर जखमी झाले आहेत. रुग्णालयातील लिफ्टमध्ये बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाला. सुदैवाने यात कोणाचाही मृत्यू झालेला नाही. या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रायगड जिल्ह्यात नवीन पनवेल शहरातील आमले हॉस्पिटलमध्ये या लिफ्टमध्ये बिघाड झाला आहे. ही लिफ्ट दुसऱ्या मजल्यावर पोहोचताच लिफ्टमध्ये बिघाड झाला आणि ती काही सेकंदातच तळ मजल्यावर येऊन आदळली. या अपघातानंतर तात्काळ अग्निशमन दलातील जवानांना बोलावण्यात आले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी डॉक्टरांची सुटका केली. त्यानंतर या डॉक्टरांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हे ही वाचा:
‘श्रेयवादाच्या नादात अपयशाचं खापर ठाकरे सरकारवर फुटेल’
श्रीलंकेत आर्थिक संकटाचा निषेध; राजधानी कोलंबोत कर्फ्यू
किरीट सोमय्या पुणे दौऱ्यावर; अनिल परबांनंतर हसन मुश्रीफ यांचा नंबर
माणसाच्या आनंदात मुक्या जनावराचा बळी!
आमले रुग्णालय हे काही महिन्यांपूर्वीच सुरु करण्यात आले आहे. आमले रुग्णालयात डॉक्टरांसाठी गेट टूगेदरचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रुग्णालयाची पाहणी झाल्यावर तिसऱ्या मजल्यावरून नऊ डॉक्टर तळ मजल्यावर जेवणासाठी निघाले होते. मात्र दुसऱ्या मजल्यावर पोहोचताच लिफ्टमध्ये बिघाड झाला आणि लिफ्ट काही सेकंदातच तळ मजल्यावर येऊन आदळली. या घटनेची नोंद खांदेश्वर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.