बलविंदर, सुलक्षण, मुझुमदार, वासिम प्रशिक्षकांच्या शर्यतीत

बलविंदर, सुलक्षण, मुझुमदार, वासिम प्रशिक्षकांच्या शर्यतीत

मुंबईच्या रणजी संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत सोमवारी (२४ मे) सायंकाळी संपल्यानंतर सुलक्षण कुलकर्णी, बलविंदर संधू, वासिम जाफर, साईराज बहुतुले, अमोल मुझुमदार, प्रदीप सुंदरम, उमेश पटवाल, नंदन फडणीस, विनोद राघवन या नऊ जणांनी अर्ज केल्याचे सूत्रांकडून कळते. एकूणच मुंबईच्या प्रशिक्षकपदासाठी चांगलीच चुरस रंगणार आहे.

आता या उमेदवारांच्या मुलाखतीतून कुणाची निवड मुंबईचा प्रशिक्षक म्हणून होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

याआधी, विजय हजारे वनडे क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबईचे प्रशिक्षक असलेल्या रमेश पोवार यांनी भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षपदासाठी अर्ज केल्यानंतर मुंबईच्या प्रशिक्षकपदासाठी पुन्हा एकदा नव्या चेहऱ्याचा शोध सुरू झाला.

हे ही वाचा:

एमसीएच्या लोकायुक्त ताहिलरामाणी काय निर्णय घेणार?

राज्यपालांकडे १२ आमदारांची नावं तरी दिलेली आहेत का?

छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या ‘रेनिसन्स स्टेट’ पुस्तकावर बंदी घाला

अबब!! चीनमध्ये ३ कोटी पुरुष अविवाहित…कशामुळे?

मुंबईच्या प्रशिक्षकपदावरून गेल्या काही महिन्यात बरेच वादविवाद झडले. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेवेळी अमित पागनीस यांची संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पण त्या स्पर्धेत मुंबईचा संघ प्राथमिक फेरीतच गारद झाला. त्यानंतर पागनिस यांनी राजीनामा दिला. नंतर रमेश पोवार यांची नियुक्ती विजय हजारे वनडे स्पर्धेपूर्वी करण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईने थेट स्पर्धेचे विजेतेपदच पटकाविले. या वर्षभरातील मुंबईचा हा तिसरा प्रशिक्षक ठरणार आहे.

प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणारी व्यक्ती ही ५० प्रथम श्रेणी सामने खेळलेली असावी. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षकपदाचे प्रमाणपत्र त्याच्याकडे असावे. राज्य संघाला किंवा आयपीएल संघाला किंवा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षक म्हणून त्याला अनुभव असला पाहिजे. शिवाय, ही व्यक्ती मुंबईतील रहिवासी असावी, असे निकष मुंबई क्रिकेट असोसिएशनने घालून दिले आहेत.

यापैकी सुलक्षण कुलकर्णी यांनी मुंबईचे प्रशिक्षकपद याआधीही भूषविलेले आहे. बलविंदर संधू हेदेखील मुंबईचे प्रशिक्षक राहिलेले आहेत. संधू यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईने १९९६-९७ मध्ये विजेतेपद पटकाविले होते. तर सुलक्षण यांच्या प्रशिक्षकपदाखाली मुंबईने २०१२-१३मध्ये विजेतेपद मिळविले होते. वासिम जाफर यांनी उत्तराखंड संघाचे प्रशिक्षकपद भूषविले आहे. साईराज बहुतुले यांच्याकडे बंगालच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे होती.

Exit mobile version