रविवार २८ मार्च पासून महाराष्ट्रात रात्रीची जमावबंदी लावण्यात येत आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून या संबंधीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात सुरु असलेला कोरोनाचा हाहाकार लक्षात घेता सरकारमार्फत हा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात कोरोना संदर्भातील एक महत्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मुख्यमंत्र्यानी जिल्हाधिकारी, विभाग आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हा कोविड रुग्णालयातील डॉक्टर्स या सर्वांशी चर्चा करून राज्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीनंतरच राज्यात २८ तारखेपासून रात्रीची जमावबंदी लावण्याचा निर्णय घेण्यात आला.
शनिवारी मुख्यमंत्री कार्यालयातर्फे या जमावबंदीची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमावलीत कुठल्या गोष्टींना कुठल्या वेळेत परवानगी आहे आणि कशावर बंदी आहे हे जाहीर करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
रात्रीस जमाव ‘न’ चाले… २८ मार्च पासून
पराभवाच्या भीतीने ममता बॅनर्जी त्रस्त, भाजपा कार्यकर्त्याला फोन करून मदतीची विनवणी
कोविड-१९ विरुद्धच्या आणखी एका लसीच्या चाचणीला सुरूवात
काय आहेत निर्बंध?
महाराष्ट्र शासनाच्या जमावबंदीच्या नियमावलीनुसार खालील प्रकारचे निर्बंध घालण्यात आले आहेत. रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत ५ पेक्षा जास्ती लोकांना एकत्रित फिरण्यास बंदी असणार आहे. या गोष्टीचे उल्लंघन केल्यावर माणशी एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. यासोबतच रात्री ८ ते सकाळी ७ यावेळेत उद्याने, समुद्र किनारे, रेस्टोरंट्स, सिनेमागृह, नाट्यगृह, मॉल्स अशी सगळी सार्वजनिक ठिकाणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रेस्टोरंट्सना रात्री ८ नंतर डिलिव्हरीची सेवा देण्यास परवानगी आहे. विना मास्क फिरणाऱ्या लोकांना ५०० रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे तर उघड्यावर थुंकणाऱ्यांकडून १००० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. सर्व प्रकारच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. लग्न समारंभांना ५० माणसांना हजार राहण्यास परवानगी असेल. तर अंत्यविधीसाठी २० जण उपस्थित राहू शकतात.
यावेळी महाराष्ट्र सरकार कडून लोकांना काही आवाहन करण्यात आले आहे. बिना मास्क फिरू नका, सोशल डिस्टंसिंग पाळा, उघड्यावर थुंकू नका, सार्वजनिक ठिकाणी पान, गुटखा, तंबाखू, दारू यांचे सेवन करू नका, शक्य तेवढे घरून काम करा, कामाच्या ठिकाणी थर्मल स्क्रिनिंग व्हावे, कार्यालयाचे नियमित सॅनिटायझेशन व्हावे असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. सार्वजनिक वाहतुकीवरही निर्बंध लावण्यात येणार आहेत आणि जे पाळणे बंधनकारक आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.