पुण्यात २८ फेब्रुवारीपर्यंत नाईट कर्फ्यू

पुण्यात २८ फेब्रुवारीपर्यंत नाईट कर्फ्यू

कोविड-१९ च्या वाढत्या केसेसच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात उद्या सोमवारपासून संचारबंदीचे नियम लागू करण्यात येणार आहेत. पुण्यात उद्यापासून संचारबंदीचे नियम लागू करण्यात येणार असले तरी त्याला संचारबंदी न म्हणता नियंत्रित संचार असे प्रशासनाकडून संबोधण्यात येत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कौन्सिल हॉलमध्ये कोरोना नियंत्रण आढावा बैठक घेतली. या बैठकीला कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार वंदना चव्हाण, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह जिल्ह्यातील सर्व खासदार उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यात नियंत्रित संचार लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच हॉटेल, रेस्टॉरंट आणि मंगल कार्यालयांसाठी सूचनाही (गाईडलाईन्स) जारी करण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा:

राज्यात पुन्हा नाईट कर्फ्यू?

पुणे जिल्ह्यातील शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासिका निम्म्या संख्येत सुरू ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. खासगी, राजकीय कार्यक्रमांसह विवाह सोहळ्याला २०० लोकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. तसेच विवाह सोहळ्यासाठी पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. परवानगीसाठी सिंगल विंडो सिस्टिम सुरू करण्यात येणार आहे.

हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारसाठी उद्यापासून निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. हॉटेल, लॉज, बार रेस्टॉरंट रात्री ११ वाजता बंद करण्यात येणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत इतरांसाठी नियंत्रित संचार बंदी लागू असणार आहे.

Exit mobile version