कॅनडास्थित खलिस्तानी समर्थक अर्श डल्ला, तीन साथीदारांविरुद्ध एनआयएचे आरोपपत्र!

एनआयएची मोठी कारवाई

कॅनडास्थित खलिस्तानी समर्थक अर्श डल्ला, तीन साथीदारांविरुद्ध एनआयएचे आरोपपत्र!

भारतातील अनेक राज्यांमध्ये कार्यरत असलेले खलिस्तान समर्थक दहशतवादी-गुंडांचे जाळे उद्ध्वस्त करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले गेले आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सोमवारी कॅनडास्थित दहशतवादी अर्शदीप सिंग उर्फ अर्श दला आणि त्याच्या तीन साथीदारांवर आरोपपत्र दाखल केले आहे.अर्शदीप सिंग उर्फ अर्श डल्ला आणि त्याचे भारतीय एजंट हरजीत सिंग उर्फ हॅरी मौर, रविंदर सिंग उर्फ राजविंदर सिंग उर्फ हॅरी राजपुरा आणि राजीव कुमार उर्फ शीला यांच्यावर नवी दिल्लीतील एनआयएच्या विशेष न्यायालयासमोर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

पंजाब आणि दिल्लीच्या विविध भागांत दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी या टोळीने चालवलेले स्लीपर सेल नष्ट करण्याचा एनआयएचा प्रयत्न असून ही मोठी कारवाई मानली जात आहे.एनआयएच्या तपासानुसार, हे तीन साथीदार खलिस्तान टायगर फोर्स या दहशतवादी गटाच्या निर्देशानुसार भारतात एक मोठी दहशतवादी-गुंडांची टोळी चालवत होते. आरोपी हॅरी मौर आणि हॅरी राजपुरा हे स्लीपर सेल म्हणून कार्यरत होते आणि त्यांना राजीव कुमार यांनी आश्रय दिला होता आणि या तिघांनी खलिस्तान टायगर फोर्सच्या निर्देशानुसार आणि त्याच्याकडून मिळालेल्या निधीतून अनेक दहशतवादी हल्ले करण्याची योजना आखली होती.

हॅरी मौर आणि हॅरी राजपुरा हे टोळीतील शूटर होते आणि त्यांना टोळीने सांगितलेल्या व्यक्तींची हत्या घडवून आणण्याचे काम सोपवण्यात आले होते. राजीव कुमार उर्फ शीला हा हॅरी मौर आणि हॅरी राजपुरा यांना आश्रय देण्यासाठी अर्श डल्लाकडून निधी मिळवत होता.राजीव कुमार हा अर्श डल्लाच्या सूचनेनुसार इतर दोघांसाठी लॉजिस्टिक सपोर्ट आणि शस्त्रास्त्रांची व्यवस्था करत असल्याचे एनआयएच्या तपासात पुढे आले आहे.एनआयएने २३ नोव्हेंबर २०२३ रोजी हॅरी मौर आणि हॅरी राजपुरा आणि १२ जानेवारी २०२४ रोजी राजीव कुमार यांना अटक केली होती. संपूर्ण दहशतवादी-गँगस्टरच्या टोळ्या नष्ट करण्यासाठी त्यांची चौकशी सुरू असल्याचे एनआयएकडून सांगण्यात आले.

Exit mobile version