जयपूर बॉम्बस्फोटचा कट रचणारा सूत्रधार आणि फरार आरोपी फिरोज खानचे पोस्टर रतलाम शहरात लावण्यात आले आहेत.राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीने (NIA) शहरातील अनेक भागात फरार आरोपी फिरोज खानचे पोस्टर लावले आहेत. तसेच फरार दहशतवादी फिरोजवर ५ लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. फिरोज हा रतलाम येथील आनंद कॉलनी येथील रहिवासी असून तो २८ मार्च २०२२ पासून फरार आहे. या प्रकरणी मुख्य सूत्रधार इरफानसह सहा आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.
हे संपूर्ण प्रकरण २८ मार्च २०२२ चे आहे, जेव्हा पोलिसांनी राजस्थानच्या निंबाहेराजवळ तपासणी करताना एका वाहनातून स्फोटके जप्त केली होती. या वाहनातून रतलाम येथील दोन दहशतवाद्यांना पकडण्यात आले होते. या दहशतवाद्यांच्या सांगण्यावरून रतलाममधून एकूण ६ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती.यामध्ये जुबेर, अल्तमश, सैफुल्ला यांच्यासह मास्टरमाइंड इम्रान याचा समावेश आहे. या प्रकरणात दहशतवादी फिरोज खान तेव्हापासून फरार असून अद्याप एनआयएच्या हाती लागलेला नाही. त्यामुळेच एनआयएकडून आता फिरोजच्या अटकेसाठी संबंधित परिसरात ठिक-ठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत.
हे ही वाचा:
आमच्यावरील तो आरोपांचा हल्ला आणि आमचा प्रतिकार केसस्टडी बनेल!
‘अयोध्येचा पुरातत्त्व अहवाल सार्वजनिक करा’
इराणमध्ये घरात घुसून पाकिस्तानच्या नऊ नागरिकांची हत्या
दरम्यान, जयपूर बॉम्बस्फोटाच्या कटातील दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर प्रशासनाने त्यांच्या घरावर बुलडोझरही चालवला होता. तत्कालीन जिल्हाधिकारी कुमार पुरुषोत्तम आणि एसपी अभिषेक तिवारी यांनी आनंद कॉलनी, विरियाखेडी येथे असलेल्या फार्म हाऊससह दहशतवाद्यांच्या अनेक अड्ड्यांचे बेकायदेशीर बांधकाम पाडले होते.
दहशतवादी अल सुफा संघटनेशी संबंधित
या संपूर्ण कटात अल सुफा नावाच्या संघटनेचे नाव समोर आले होते.ही संघटना देशविरोधी कारवायांमध्ये सामील होती. रतलाममध्येच या संघटनेची स्थापना झाली. हिंदू संघटनांच्या अधिकाऱ्यांच्या हत्येतही या संघटनेचे अनेक सदस्य सहभागी होते.तसेच या संघटेनचे लोक आता जयपूरमध्ये दहशत माजवण्याचा कट रचत होते.यामुळेच एनआयएकडून हे संपूर्ण प्रकरण ‘स्पेशल कॅटेगरी केसच्या’ श्रेणीत ठेवण्यात आले असून चौकशीसाठी एजन्सीचे अधिकारी सातत्याने रतलामला भेट देत आहेत.