‘पुढचा टप्पा लवकरच सुरू होत आहे, त्यासाठी सज्ज राहा,’ अशा सूचना इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू यांनी गाझाबाहेरील सैनिकांना दिल्या आहेत. नेतन्याहू यांनी आघाडीवरील इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) सैनिकांशी संवाद साधला आणि सैन्य पुढील टप्प्यासाठी सज्ज असल्याचे ठामपणे सांगितले.इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गाझा पट्टीत आघाडीवर असलेल्या इस्रायल संरक्षण दलाच्या सैनिकांना भेट दिली आणि सैन्याचे मनोबल वाढवले. सैनिकांशी झालेल्या संवादाचे व्हिडीओ शेअर करताना, इस्रायली पंतप्रधानांनी ‘आम्ही सर्व सज्ज आहोत,’ असे ठामपणे सांगितले.
बेंजामिन नेतन्याहू यांनी शनिवारी गाझा पट्टीबाहेर इस्रायली पायदळ सैनिकांना भेट दिली. ‘तुम्ही पुढच्या टप्प्यासाठी तयार आहात? पुढचा टप्पा येत आहे,’ असे ते बोलत असल्याचे ऐकू येत आहे.
हमासच्या ‘ऑपरेशन अल अक्सा फ्लड बॅटल’चा बदला म्हणून इस्रायलने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड्स’ बद्दल ते दृढनिश्चयी दिसत आहेत. व्हिडिओमध्ये सैनिक त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना होकार देताना दिसत आहेत. त्यानंतर इस्रायली पंतप्रधानांनी त्यांच्याशी हस्तांदोलन केले.
हमास दहशतवाद्यांच्या आकस्मिक हल्ल्यांना इस्रायलकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. गाझामध्ये जमीन आणि हवाई अशा दोन्ही बाजूंनी लष्करी हल्ल्यांसह प्रत्युत्तर दिले जात आहे. दोन्ही बाजूंमधील रक्तरंजित संघर्षात आतापर्यंत तीन हजार २०० लोकांचा बळी गेला आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी गेल्या आठवड्याच्या शेवटी दक्षिण इस्रायलच्या दिशेने रॉकेटचा गोळीबार केल्यानंतर काही तासांनंतर, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धाची घोषणा केली आणि अत्यंत ताकदीने प्रत्युत्तर देण्याचे आश्वासन दिले. तेव्हापासून, गाझा अधिकाऱ्यांनी १९००हून अधिक पॅलेस्टिनी लोकांच्या मृत्यूची नोंद केली आहे.
हे ही वाचा:
भारतापुढे पाकिस्तानची दाणादाण, भारताचा आठवा वर्ल्डकप विजय
प्रशांत किशोर यांनी दिले नीतिश कुमारांना आव्हान
इस्रायलने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये हमासच्या एरियल फोर्सचा प्रमुख ठार
बोगस पासपोर्ट प्रकरणी सीबीआयचे ५० ठिकाणी छापे
युएन इंटरनॅशनल चिल्ड्रेन्स इमर्जन्सी फंड (युनिसेफ) च्या प्रवक्त्याने सांगितल्यानुसार, गेल्या शनिवारी, संघर्ष सुरू झाल्यापासून गाझा पट्टीमध्ये ७०० मुले मारली गेली आहेत. इस्रायली सैन्याने लाखो पत्रके वाटून संपूर्ण गाझा पट्टीतील रहिवाशांना स्वतःच्या सुरक्षेसाठी हे युद्धक्षेत्र सोडून देण्याचे आवाहन केले आहे. तसेच, इस्रायल-हमास युद्ध चिघळण्याचे संकेत दिले. तर, हमास गटाने त्यांना हा भाग सोडू नका, असे उलट आवाहन केले आहे.”गाझामधील नागरिकांनी हा भाग सोडून जावे, जेणेकरून त्यांना या युद्धाची झळ बसणार नाही,’ असे आवाहन इस्रायल डिफेन्स फोर्सने शुक्रवारी केले. इस्रायली सैन्याने जमिनीवर घुसखोरी करण्याची तयारी केल्यामुळे चार लाखांहून अधिक नागरिक गाझा पट्टीच्या दक्षिणेकडील भागात स्थलांतरित झाल्याचे संयुक्त राष्ट्रांनी रविवारी सांगितले.
गाझामधील लाखो रहिवाशांनी संघर्ष क्षेत्रातून पलायन केल्याची माहिती आहे, तर अनेक सरकारांनी इस्रायलच्या इशाऱ्यांचा निषेध केला आहे. इस्रायली पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या संबोधनात हमासला चिरडण्याचे आश्वासन दिले आणि सशस्त्र गटाची बरोबरी आयएसआयएसशी केली. ‘आम्ही हमासचा नाश करू, आम्ही हमासला पराभूत करू. याला वेळ लागेल. युद्ध सातव्या दिवसात दाखल झाले आहे. शत्रूंनी नुकतीच किंमत मोजायला सुरुवात केली आहे. आयडीएफ सैनिक सिंहांसारखे लढत आहेत,’ असे ते म्हणाले.