मुघलांचे अनौरस वारसदार

मुघलांचे अनौरस वारसदार

मुघल राजवटीच्या नावाने अलिकडे अनेकांना उचक्या लागतात. काहींचा उर भरून येतो. केवळ दोनेक पडीक सिनेमे इतकीच कारकीर्द असलेल्या दिग्दर्शक कबीर खानला मुघलांच्या नावाने लागलेली उचकी ताजी आहे. ‘मुघल हे भारताचे खरे शासक होते. त्यांचे चुकीच्या पद्धतीने केलेले चित्रण पाहून त्रास होतो’, अशी खंत त्याने व्यक्त केली आहे.

देशातील डाव्या इतिहासकारांनी भारताच्या इतिहासाचे पद्धतशीरपणे इस्लामीकरण केले. मौर्य, चालुक्य, राष्ट्रकूट, कनिष्क, नंद, शृंग, गुर्जर-प्रतिहार, सातवाहन कुळातील चक्रवर्ती सम्राटांचा भारतीयांना विसर पडावा, अशा पद्धतीने इतिहासाची मांडणी झाली. रामायण आणि महाभारताला काल्पनिक ठरवून त्यावर फुली मारण्यात आली. इतिहासाचे धिरडे केले आणि तेच पिढ्यान् पिढ्या लोकांना वाढण्यात आले. मुघल काळाचे नाव घेऊन अश्रू ढाळणाऱ्या लोकांना या इतिहासकारांचा मोठा आधार असतो.

परंतु लोकांना फार काळ मूर्ख बनवता येत नाही. मुघल हे आक्रमक होते, रानटी होते, त्या काळातील तालिबान होते हे उच्चारवाने सांगणारे असंख्य पुरावे आजही देशाच्या कानाकोपऱ्यात विखुरले आहेत. बाबराने दिल्ली जिंकली ते साल १५२६. त्यानंतर भारतात मुघलांची राजवट आली, परंतु मुघलांच्या झेंड्याखाली संपूर्ण भारत कधीच नव्हता. एकेका भूभागावर त्यांना कडवे आव्हान मिळत होते. कुठे राणा सांगा, महाराणा प्रताप, गुरू गोविंद सिंह, छत्रपती शिवाजी महाराज, लाचित बडफुकन असे कैक वीर पुरुष आक्रमक मुघलांना टक्कर देत होते. बळकावलेला प्रदेश काबीज करीत होते. त्यांनी मुघलांचा चांद तारा भारतात स्थिरस्थावर होऊ दिला नाही. शूर अहोम राजांच्या प्रभावाखाली असलेला ईशान्य भारत मुघलांना कधीच जिंकता आला नाही.

बाबरानंतर हुमायून, अकबर, त्यानंतर शहाजहान, औरंगजेब अशी मुघलांची वंशावळ आहे. औरंगजेबाच्या काळात मुघलांना फक्त दक्षिणेत कावेरीच्या खोऱ्यापर्यंत सरकता आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यामुळे मुघलांच्या विस्तारवादाला पायबंद बसला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर म्हणजे १७०७ नंतर दिल्लीतील मुघल रियासत टेकूसाठी कायम मराठा साम्राज्याकडे पाहू लागली. पुढे तख्त मुघलांचे असले तरी रियासत मराठ्यांची अशी स्थिती होती. पेशव्यांच्या ओंजळीने मुघल सल्तनत पाणी पिऊ लागली. शिंदे, होळकरांच्या तलवारी संपूर्ण उत्तर हिंदूस्तानात तळपत होत्या. मुघलांना ‘दे माय धरणी ठाय’ करीत होत्या. पेशव्यांच्या फौजांनी अटकेपर्यंत धडक दिली. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याला उतरती कळा लागली. अर्थात १७०० पर्यंतही मुघल साम्राज्याला स्थैर्य असे लाभलेच नाही. त्यामुळे जेमतेम १५० वर्षांचा कार्यकाळ लाभलेले मुघल भारताचे खरे शासक कसे म्हणता येईल?

कसा होता हा काळ?
हिंदू प्रजेवर जुलूम, बाटवाबाटवी, बलात्कार, अत्याचार आणि शोषण ही मुघल राजवटीची वैशिष्ट्ये होती. हिंदुस्तानचे इस्लामीकरण हे त्यांचे ध्येय होते. त्यासाठी त्यांनी भारतात उत्तरे पासून दक्षिणेपर्यंत रक्तामांसाचा चिखल केला. मुघल काळात हजारो मंदिरे तोडली गेली, लाखो हिंदूंच्या हत्या करण्यात आल्या. बाबराच्या काळात अयोद्धेतील राम जन्मभूमीवर उभे असलेले मंदिर उध्वस्त करण्यात आले. अकबराच्या काळात राजपूत स्त्रियांना जनानखान्यात, मीनाबाजारात भरण्याचा प्रकार सुरू झाला. हरप्रकारे हिंदूंना अपमानित करण्याचे काम मुघल राज्यकर्ते आणि त्यांचे मनसबदार करीत होते.

औरंगजेबाच्या काळात हिंदूंवर जिझिया कर आकारण्यात आला. बाटवाबाटवी हा औरंगजेबाचा शौक होता. बजाजी निंबाळकर, नेतोजी पालकर अशा अनेक मराठा सरदारांना त्याने बाटवले. छत्रपती शिवाजी महाराजांनी शुद्धीकरण करून त्यांना पुन्हा स्वधर्मात घेतले. इस्लाम स्वीकारावा म्हणून औंरग्याने छत्रपती संभाजी महाराजांचा केलेला छळ मुघलांच्या रानटी मानसिकतेचा परिचय देणारा आहे.

हे ही वाचा:

ज्येष्ठ लेखक, नाट्य समीक्षक जयंत पवार यांचे निधन

आमदार केळकरांच्या प्रयत्नाने मिळाले ट्रॅफिक वॉर्डनचे थकीत पगार

२०५० मध्ये मुंबई बुडणार? मंत्रालय, नरिमन पॉइंट जाणार पाण्याखाली

धुरंधर ढेपाळले, भारताचा दारुण पराभव

औरंगजेब या धर्मवेडाचे शिखर असला तरी बाकीच्या मुघल राज्यकर्त्यांचा कारभार म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ असा होता. प्रत्येकाच्या राजवटीत बाटवाबाटवी आणि मंदिरांचा विध्वंस झालाच. डाव्यांना अकबराचे मोठे कौतूक असते. त्याच्या काळात राजपूतांच्या, जाटांच्या कन्या मुघल जनानखान्यात दाखल झाल्या. परंतु हिंदूसोबत सलोखा निर्माण करण्यासाठी मुघल घराण्यातील एखादी कन्या राजपूताला दिल्याचे औदार्य त्याने दाखविल्याचे ऐकिवात नाही.

मुघलांची भलामण म्हणजे त्यांच्या जुलमी राजवटीविरोधात उभ्या ठाकलेल्या प्रत्येक राष्ट्रपुरूषाचा अपमान आहे. मुघलांच्या धर्मवेडासमोर, आत्यंतिक क्रौर्यासमोर न झुकलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा, कातडे सोलल्यानंतर आणि डोळे काढल्यानंतर धर्माशी एकनिष्ठ राहणाऱ्या बंदा बैरागी यांच्या बलिदानाचा, कोवळ्या मुलांना भिंतीत चिणून ठार केल्यानंतरही स्वधर्मासाठी झुंजणाऱ्या गुरू गोविंद सिंहांचा आणि अशा लाखो रणधुरंधरांचा अपमान आहे. मुघलांशी झुंजताना कित्येकांनी प्राणांचे बलिदान दिले. रक्त, अश्रूंचे अर्घ्य देऊन बलिदानाचा हा यज्ञ हिंदू वीरांनी धगधगत ठेवला.

बॉलिवूडातील भामट्यांना हा इतिहास माहीत नाही असे नसते, परंतु या बाटग्यांना आपल्या पूर्वजांनी हिंदुस्तानवर राज्य केले याची आठवण करून देऊन हिंदूंना अपमानित करायचे असते. बॉलिवूडची घडणच अशी झाली आहे. या देशात अकबरावर ‘मुघल-ए-आझम’ सारखा सिनेमा बनला. परंतु छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रतापावर सिनेमा बनला नाही. हिंदूंचा इतिहास अडगळीत टाकण्याचे काम बॉलिवूडने इमाने इतबारे केले. एकेकाळी अंडरवर्ल्डच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या बॉलिवूडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा बनला नाही हे एका अर्थाने इतिहासावर मोठे उपकारच आहेत. संजय खानने टिपू सुलतानवर मालिका बनवली त्यात त्या क्रूरकर्म्याला राष्ट्रभक्त दाखवून त्याचे महिमामंडन करण्यात आले होते. हिंदूंचे शिरकाण करणारा, केवळ इस्लामी राजवटीसाठी लढणारा टिपू कोणी मोठा स्वातंत्र्ययोद्धा असल्यासारखी पटकथा प्रेक्षकांच्या माथी मारण्यात आली होती.

जागृत झालेले हिंदू जनमानस आता हा भाकड इतिहास ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही. अयोद्धेतील श्रीराम जन्मभूमी परिसराच्या उत्खननात सापडलेले मंदिराचे भग्नावशेष मुघलांच्या जुलमी राजवटीचे पुरावे आहेत. असे अनेक पुरावे काशीतील बाबा विश्वनाथ मंदीर, कृष्ण जन्मभूमी मथुरेच्या भूमीत आणि मशीद बनवलेल्या हजारो मंदिरांच्या पायथ्याशी दडलेले आहेत.

मुघलांची राजवट ही भारतातील तालिबानी राजवट होती. हिंदू वीरांनी आपल्या शौर्य आणि बलिदानाने ही राजवट नेस्तनाबूत केली. याच हिंदू शौर्याने देशाच्या पुनरुत्थानाचा संकल्प सोडला आहे. १९९२ मध्ये विध्वंसक मुघल राजवटीने लावलेला एक कलंक हिंदूंनी धुवून काढला. दिल्लीतील औरंगजेब रस्त्याचे नाव २०१५ मध्ये बदलून आणखी एक कलंक आपण पुसला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आगऱ्यातील मुघल म्युझिअमचे नाव बदलून छत्रपती शिवाजी म्युझिअम केले.

‘कधी काळी या देशावर आमचे राज्य होते’, या मानसिकतेने १९४७ मध्ये देशाची फाळणी केली. त्यानंतरही काँग्रेसने ही मानसिकता कुरवाळून मोठी केली. जुलमी मुघलांचे उदात्तीकरण काँग्रेसच्या राज्यात मोठ्या प्रमाणावर झाले. दिल्लीतील रस्त्यांना या तमाम मुघलांची नावे देऊन सतत हिंदू समाजाला अपमानित करण्याचे काम केले. हिंदू समाजाने त्या काँग्रेसचा हिशोब गेल्या दोन निवडणुकीत इन्स्टॉलमेंटमध्ये चुकता केला आहे. काही हिशोब अजून बाकी आहेत. ‘आम्ही या देशावर राज्य केले’, या मानसिकतेला कुरवाळणाऱ्यांची देशात आजही कमतरता नाही. परंतु हा देश आता तालिबानी प्रवृत्तीला आणि त्यांच्या पाठीराख्यांना थारा देण्याच्या मूडमध्ये नाही, हे त्यांनी आता लक्षात घेतलेले बरे. मुघलांची भलामण करणारे आता पुन्हा सत्तेवर येणार नाही, याची काळजी हिंदू घेतीलच. आक्रमकांचे महिमामंडन करणाऱ्या ‘द एम्पायर’ सारख्या मालिका बनवणाऱ्या माध्यमांना भिकेला लावण्याची क्षमताही हिंदूंकडे निश्चितपणे आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version