मुसळधार पाऊस, महापूर अशा संकटांत अवघा महाराष्ट्र कोलमडून गेला आहे, गलितगात्र झाला आहे. गेल्या आठवड्यात पडलेल्या प्रलयकारी पावसामुळे रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, कोल्हापूर, सातारा, सांगलीत महापुराने थैमान घातले आहे. शहरे, गावे काही दिवस अक्षरशः पाण्याखाली होती. चिपळूणसारखा कोकणातील मोठा तालुका पुराने अस्ताव्यस्त झाला. एसटीच्या बसेस पाण्याखाली गेल्याचे आणि त्याच्या टपावर डोळ्यात प्राण आणून मदतीची प्रतीक्षा करत असलेले एसटीचे कर्मचारी पाहून पुराची भयावहता आणि माणसाची अगतिकता दिसून आली. त्यातच दरडींचे संकट अनेक अभागी जीवांवर कोसळले. या दरडींखाली अनेक कोवळ्या जीवांसह महिला, पुरुषांचे जीवन साखरझोपेतच चिरडून संपून गेले. महाडच्या तळीये, सातारच्या आंबेघरमध्ये या दरडींमुळे हाहाःकार उडाला. अवघ्या महाराष्ट्रात ९० लोक दरडींमुळे मरण पावले. त्यांचे मृतदेह बाहेर काढताना बचावपथकालाही अश्रु आवरले नाहीत. लहानग्यांचे मृतदेह हातात घेतलेले हे बचावपथकातील कर्मचारी पाहून महाराष्ट्राचे हृदय पिळवटून निघाले. अनेकांनी आपले जवळचे नातेवाईक गमावले, आयुष्यभर खपून गोळा केलेला संसार मातीमोल झाला. घराघरात चिखलाचे साम्राज्य तयार झाले. होत्याचे नव्हते झाले. घर, दुकाने बर्बाद झाली. आधीच लॉकडाऊन त्यात व्यवसायातून मिळणाऱ्या अल्प उत्पन्नाचा मार्गही महापुरात वाहून गेला. या सगळ्या महाप्रलयाच्या परिस्थितीत सरकारच्या मदतीची वाट न पाहता लोकांनी एकमेकांचे अश्रु पुसले. आपल्या सहृदयतेचे दर्शन घडविले. आपल्या परीने प्रत्येकाने मदतीचा हात पुढे केला आहे. ‘न्यूज डंका’ आणि ‘कारुळकर प्रतिष्ठान’नेही या संकटकाळात पूरग्रस्तांना सावरण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
कारुळकर प्रतिष्ठान ही संस्था गेली ५३ वर्षे सामाजिक कार्यात सक्रिय आहे. ठाणे, पालघर जिल्ह्यातील आदिवासी विभागात त्यांनी शाळा, सोयीसुविधा, नोकऱ्या उपलब्ध करून देत त्यांना आधार दिला आहे. हे समाजकार्य आता महाराष्ट्राशिवाय गुजरात, कर्नाटक, तेलंगण उत्तर प्रदेश अशा विविध राज्यांतही विस्तारले आहे.
कोरोनाच्या संकटकाळात तर कारुळकर प्रतिष्ठानने लक्षणीय काम केले. आता महाराष्ट्रातील पूरग्रस्तांनाही मदतीचा हात देण्याचा निर्धार संस्थेने व्यक्त केला आहे.
कारुळकर प्रतिष्ठानने हे समाजकार्य नेहमीच स्वतःच्या उत्पन्नातील हिस्सा वापरूनच केले आहे. स्वतःच्या खिशातून खर्च करत आपदग्रस्तांना आधार दिला आहे. मात्र आताचे संकटच इतके मोठे आहे की, प्रत्येकानेच त्यात हातभार लावण्याची गरज आहे, असे आवाहन कारुळकर प्रतिष्ठानचे संचालक प्रशांत कारुळकर यांनी केले आहे.
हे ही वाचा:
भास्कर जाधव थोडी लाज बाळगा…
…आणि नवनीत राणांना अश्रू अनावर झाले
पूरग्रस्तांच्या मनाला डागण्या देणारे दौरे करण्यापेक्षा मुख्यमंत्री घरी बसलेले बरे होते…
‘न्यूज डंका’चे सर्व पत्रकार आणि ‘कारुळकर प्रतिष्ठान’चे कार्यकर्ते अशा प्रत्येकाने पूरग्रस्तांसाठी आपल्या वेतनातील काही हिस्सा देण्याचे ठरविले आहे.
आपणही या कार्यात सहभागी होऊ शकता. स्वेच्छेने या कार्यासाठी योगदान देऊ शकता. खालील अकाऊंट नंबरवर आपण आपली मदत पाठवू शकता. दात्यांना 80G अंतर्गत करसवलतीचे लाभ मिळतील.
Account Name :- Karulkar Pratisthan
A/c no :- 010220110001040
Bank :- Bank of India
Branch :- IGIDR Goregaon East
IFSC code :- BKID0000102