न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्ध टी२० मालिकेत आपले वर्चस्व कायम ठेवत युनिव्हर्सिटी ओव्हल येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात ५ विकेटने सहज विजय मिळवला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत २-० ची आघाडी घेतली.
पावसामुळे १५ षटकांच्या सामन्यात फलंदाजीसाठी उतरलेल्या पाकिस्तानने कर्णधार सलमान अली आगाच्या २८ चेंडूंत ४६ धावांच्या खेळीच्या जोरावर १३५/९ धावा केल्या. ज्यामध्ये चार चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. शादाब खान (२६) आणि शाहीन शाह आफ्रिदी (नाबाद २२) यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले. न्यूझीलंडसाठी बेन सियर्स, ईश सोढ़ी, जेकब डफी आणि जेम्स नीशम यांनी प्रत्येकी दोन जणांना तंबूत धाडले.
उत्तरादाखल, न्यूझीलंडचा सलामीवीर टिम सीफर्ट (४५) आणि फिन अॅलन (३८) यांनी पहिल्या विकेटसाठी ६६ धावांची वेगवान भागीदारी करत १३.१ षटकांत ५ विकेट्सच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. पाकिस्तानकडून हारिस रौफने ३ षटकांत २० धावा देत २ गडी बाद केले.
कर्णधार मायकेल ब्रेसवेलने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, डफीने पहिल्याच षटकात सलामीवीर हसन नवाजला बाद केले. बेन सियर्सने लगेचच आणखी एक महत्त्वाचा बळी घेत मोहम्मद हारिसला ११ धावांवर माघारी पाठवले.
कर्णधार आगा संघाला सावरू पाहत होता. त्याने काही अप्रतिम फटकेही मारले, पण सोढ़ीने पाकिस्तानला वेसन घातले. त्याने आधी इरफान खानला बाद केले आणि त्याच षटकात खुशदिल शाहला पायचीत करत पाकिस्तानला मोठा धक्का दिला.
आगाने २८ चेंडूंत ४६ धावा करत संघाला चांगल्या स्थितीत नेण्याचा प्रयत्न केला. पण दहाव्या षटकात सियर्सने त्याला बाद करत पाकिस्तानला अडचणीत टाकले. शादाब (१४ चेंडूंत २६) आणि आफ्रिदी (१४ चेंडूंत २२) यांनी आक्रमक खेळ करत संघाला १३५/९ धावसंख्येपर्यंत पोहोचवले.
१३६ धावांचे लक्ष्य गाठताना न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी आक्रमक सुरुवात केली. अॅलनने दुसऱ्या षटकात मोहम्मद अलीच्या गोलंदाजीवर सलग तीन षटकार मारत सामना झटपट संपवण्याचा संकेत दिला. तिसऱ्या षटकात सीफर्टनेही आफ्रिदीच्या गोलंदाजीवर चार षटकार ठोकले. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस न्यूझीलंडने सात षटकार मारले होते.
सीफर्टने २२ चेंडूंत ४५ धावा केल्या पण पाचव्या षटकात मोहम्मद अलीच्या गोलंदाजीवर मिडऑनवर झेलबाद झाला. अॅलनने सातव्या षटकात जहानदाद खानच्या गोलंदाजीवर दोन षटकार मारले पण लगेचच पायचीत झाला. त्याने १६ चेंडूत ३८ धावा करत न्यूझीलंडला ७ षटकांत ८८/२ वर मजबूत स्थितीत नेले.
यानंतर मार्क चॅपमन स्वस्तात बाद झाला. त्यानंतर रौफने डेरिल मिचेल आणि नीशम यांचे महत्त्वाचे विकेट्स घेतले. मात्र, मिचेल हेने १६ चेंडूत नाबाद २१ धावा करत विजय सुकर केला आणि ब्रेसवेलने चौकार मारत न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
न्यूझीलंड १३.१ षटकांत १३७/५ (टिम सीफर्ट ४५, फिन अॅलन ३८; हारिस रौफ २-२०) ने पाकिस्तानला १५ षटकांत १३५/९ (सलमान आगा ४६, शादाब खान २६; जेकब डफी २-२०, बेन सियर्स २-२३) वर पराभूत केले.