जलदगती गोलंदाज जेकब डफी आणि जकारी फॉलेक्स यांच्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडने रविवारी बे ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या टी२० सामन्यात पाकिस्तानला ११५ धावांनी पराभूत करत पाच सामन्यांच्या मालिकेत ३-१ अशी अजेय आघाडी मिळवली.
न्यूझीलंडची विस्फोटक फलंदाजी
प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने २० षटकांत २२०/६ धावा केल्या. फिन अॅलनने अवघ्या २० चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने अर्धशतक ठोकले. टिम सीफर्ट (४४) आणि मायकेल ब्रेसवेल (नाबाद ४६) यांनीही महत्त्वाचा वाटा उचलला. पाकिस्तानकडून हारिस रौफने ३-२७ अशी प्रभावी गोलंदाजी केली, तर अबरार अहमदने दोन बळी घेतले.
पाकिस्तानची ढासळलेली फलंदाजी
उत्तर देताना, न्यूझीलंडच्या वेगवान माऱ्याने पाकिस्तानचा नऊ पैकी दहा फलंदाजांना बाद केले. ज्यामुळे संपूर्ण संघ १६.२ षटकांत १०५ धावांवर गुंडाळला गेला. पाकिस्तानसाठी अब्दुल समदने सर्वाधिक ३० चेंडूत चार चौकार आणि दोन षटकारांसह ४४ धावा केल्या. न्यूझीलंडकडून डफी सर्वोत्तम गोलंदाज ठरला, त्याने ४ विकेट्स घेतले. तर फॉलेक्सने ३-२५ अशी कामगिरी केली.
२२१ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान ओसच्या प्रभावाचा फायदा घेऊ शकला नाही. कारण न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांनी सतत दबाव टाकला. विल ओ’रूर्केने डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर मोहम्मद हारिसला बाद केले. त्यानंतर डफीने दुसऱ्याच षटकात हसन नवाज आणि कर्णधार सलमान आघाला बाद करून पाकिस्तानला अडचणीत टाकले. फॉलेक्सनेही लगेच प्रभाव दाखवत पाचव्या षटकात शादाब खानला तंबूचा रस्ता दाखवला. त्यामुळे ९.६ षटकांत पाकिस्तानचा स्कोर ५६/८ झाला आणि सामना अर्ध्यातच एकतर्फी वाटू लागला.
यानंतर डफीने हारिस रौफला बाद केले आणि अब्दुल समदने एकटा लढा देत ३० चेंडूत ४४ धावा फटकावल्या. डफीने आपल्या शेवटच्या षटकात आणखी एक विकेट घेतली आणि ४ षटकांत २० धावा देत ४ बळी मिळवले, तर फॉलेक्सने ३ बळी घेतले.
न्यूझीलंडने शेवटच्या षटकांत वेग वाढवला
यापूर्वी, न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी दमदार सुरुवात केली होती. सीफर्ट आणि अॅलन यांनी मिळून ३.५ षटकांतच संघाला ५० धावांचा टप्पा पार करून दिला. मात्र, पाकिस्तानला लगेच यश मिळाले. हारिस रौफने सीफर्टला बाद केले. सीफर्टने डीप मिडविकेटवर पुल मारला, पण खुशदिलने अप्रतिम झेल टिपला.
हेही वाचा :
विग्नेश पुथुर पदार्पणाच्या सामन्यात चमकला!
मुंबईतील ऐतिहासिक बंगल्याची २७६ कोटींना विक्री; यापूर्वीही झालेत असेच कोट्यवधींचे व्यवहार
जिथे जिथे हिंदूंची संख्या कमी झाली तिथे त्यांना मारहाण झाली, हिंदूंनी संख्या वाढवावी!
गाझाच्या नास्सेर हॉस्पिटल संकुलात लपलेल्या दहशतवाद्यांवर इस्रायलचा हल्ला
न्यूझीलंडने पॉवर-प्लेमध्ये ७९/१ धावा फलकावर लावल्या. जे पुरुषांच्या टी२० क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्ध दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक पॉवर-प्ले रन ठरले. सीफर्ट बाद झाल्यानंतर, अॅलनने आक्रमण सुरूच ठेवले आणि अवघ्या १९ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. मात्र, अब्बास आफ्रिदीच्या पुढच्याच चेंडूवर मिड-ऑफवर झेलबाद झाला.
१३४/२ वरून न्यूझीलंडचा स्कोर १४९/५ वर घसरला. कारण पाकिस्तानच्या गोलंदाजांनी सलग पाच षटकांत एकही चौकार किंवा षटकार मारू दिला नाही. तरीही न्यूझीलंडने शेवटच्या ५ षटकांत ६३ धावा जोडल्या. डेरिल मिचेलने २३ चेंडूत २९ धावा केल्या, पण ब्रेसवेलच्या ४६ धावांच्या खेळीमुळे न्यूझीलंडने २०० धावांचा टप्पा सहज पार केला.