मुंबईतील वानखेडे मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या अजाझ पटेल याने आज भारताच्या १० फलंदाजांना तंबूत धाडून ऐतिहासिक अशी कामगिरी केली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडचा पहिला डाव ६२ धवांवर संपुष्टात आणला. भारताने पुन्हा फलंदाजीला सुरुवात करत ३२३ धावांची आघाडी घेतली आहे.
पहिल्या दिवशी मुंबईत झालेल्या पावसामुळे सामन्यातही व्यत्यय आला आणि त्यामुळे पहिले सत्र खेळवता आले नाही त्यानंतर भारताने पहिल्या दिवसअखेर चार विकेट गमावत २२१ धावा केल्या होत्या. काल मयंक अग्रवाल १२० धावांवर नाबाद होता त्याने आज ३० धावांचे योगदान दिले. मयंक माघारी परतल्यावर अक्षर पटेलने अर्धशतकी खेळी करत अखेरच्या षटकांमध्ये भारताला ३०० पार नेले. दरम्यान, भारताचा डाव ३२५ धावांवर संपुष्टात आला. अजाझ पटेलने एकट्याने भारताचे सर्व फलंदाज बाद केले.
भारताला ३२५ धावांत रोखल्यानंतर पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघाला भारतीय गोलंदाजांनी अवघ्या ६२ धावांमध्ये रोखले. न्यूझीलंडकडून काईल जेमिनसन आणि टॉम लॅथम यांनी अनुक्रमे १७ आणि १० धावा करत दुहेरी धावसंख्या गाठली. भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत रवीचंद्रन अश्विनने ८ षटकात ८ धावा देत ४ बळी घेतले. तर मोहम्मद सिराज याने ४ षटकात १९ धावा देत ३ बळी घेतले. तसेच अक्षर पटेलला २ आणि जयंत यादवला १ बळी घेण्यास यश आले.
हे ही वाचा:
कर्नाटकनंतर गुजरातमध्ये ओमिक्रोनची एंट्री
ठाकरे सरकारच्या चुकीमुळे वाढले नारायण राणेंचे सुरक्षा कवच?
एटीएम पडले मागे; लोक करत आहेत घरबसल्या व्यवहार
चिडलेले शेतकरी शांत होऊन गेले! कंगनाने असे काय केले?
त्यानंतर भारताने पुन्हा फलंदाजीला सुरुवात करत मयंक अग्रवाल याने ७५ चेंडूत ३८ धावा केल्या आहेत तर चेतेश्वर पुजारा याने ५१ चेंडूत २९ धावा केल्या आहेत.
अजाझ पटेल याने ऐतिहासिक कामगिरी करत एकाच डावात १० बळी मिळवण्याचा विक्रम केला. अजाझ याने ११९ धावांत हे १० बळी घेतले. याआधी जिम लेकर आणि अनिल कुंबळे यांनी १० बळींचा विक्रम नोंदविला होता. इंग्लंडच्या जिम लेकर यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५७ धावांत १० बळी (१९५६) तर कुंबळेने पाकिस्तानविरुद्ध १९९९मध्ये दिल्लीत ७४ धावांत १० बळींची नोंद केली होती.