डेव्हन कॉनवेची ५४ धावांची खेळी आणि सलामीवीर टॉम लॅथमसह पहिल्या विकेटसाठी केलेली ७० धावांची भागीदारी या जोरावर न्यूझीलंडने भारताविरुद्धच्या कसोटी अजिंक्यपद अंतिम लढतीच्या पहिल्या डावात २ बाद १०१ धावा केल्या.
इंग्लंडमधील साउदम्प्टन येथे सुरू असलेल्या या कसोटीचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी भारताचा डाव ३ बाद १४६ वरून तिसऱ्या दिवशी सर्वबाद २१७ धावांवर आटोपला. या धावसंख्येला उत्तर देताना न्यूझीलंडने २ बाद १०१ धावा केल्या. आता न्यूझीलंडचा संघ ११६ धावांनी पिछाडीवर आहे. त्यामुळे आता उरलेल्या दोन दिवसांत सामन्याचे चित्र काय असेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.
हे ही वाचा:
लोकसंख्या नियंत्रण कायदा आणायची योगी सरकारची तयारी
हॅाटेल चालकांना परवाना शुल्कात हवी सूट
आता विधि अभ्यासक्रम पदवीचा गोंधळ
शिवसेनेचे मुख्यमंत्री, तरी होत नाहीत शिवसेना आमदारांची कामे
भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या दिवशी संयमी खेळी केली खरी, पण तिसऱ्या दिवशी भारताचा डाव गडगडला. विराट कोहली (४४) आणि अजिंक्य रहाणे (४९) यांचा अपवाद वगळता भारताच्या इतर फलंदाजांकडून अपेक्षित खेळ झाला नाही. कोहली-रहाणे यांनी चौथ्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी केली. मात्र याची पुनरावृत्ती पुढील फलंदाजांना करता आली नाही. त्यामुळे भारताचा डाव २१७ धावांतच गुंडाळला गेला. न्यूझीलंडच्या कायले जॅमिसनने ३१ धावांत ५ बळी घेत सर्वोच्च कामगिरी केली. तर नील वॅगनरने २ बळी घेतले.
न्यूझीलंडने या धावसंख्येला उत्तर देताना संयमी खेळ केला. लॅथम आणि कॉनवे जोडीने पहिल्या विकेटसाठी भागीदारी करताना चिवट खेळाचे प्रदर्शन केले. आर. अश्विनने ही जोडी फोडली. त्याने ३५ व्या षटकांत लॅथमला बाद केले नंतर दुसरा सलामीवीर कॉनवे इशांत शर्माच्या गोलंदाजीवर बाद झाला. दिवसअखेर केन विल्यमसन (१२) आणि रॉस टेलर (०) मैदानावर होते.
संक्षिप्त धावफलक
भारत (पहिला डाव) २१७ (विराट कोहली ४४, अजिंक्य रहाणे ४९, जॅमिसन ३१-५) वि. न्यूझीलंड (पहिला डाव) २ बाद १०१ (कॉनवे ५४, लॅथम ३०, इशांत १९-१, अश्विन २०-१)