महाराष्ट्रात कोविड रुग्णांची वाढ भयावह गतीने होत आहे. महाराष्ट्र राज्यात भारतातीलच नव्हे, तर आशियातील सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या आहे, तर दैनंदिन रुग्णवाढीत देखील महाराष्ट्र अव्वल ठरत आहे.
गेल्या चोविस तासात महाराष्ट्रात एकूण २५,६८१ नव्या रुग्णांची नोंद झाली. यात पुणे जिल्ह्यातील रुग्णवाढ सर्वात भयानक असल्याचे दिसत आहे. पुणे जिल्ह्यातील रुग्णवाढ संपूर्ण पाकिस्तानपेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानात ३,४९५ इतके नवे रुग्ण आढळून आले, तर एकट्या पुण्यात ४,९७५ नवे रुग्ण नोंदले गेले.
हे ही वाचा:
फडणवीसांचे नागरिकांना लस घेण्याचे आवाहन
बायडन-पुतीन यांच्यात वाक् युद्ध
गोव्यातही महाराष्ट्राच्या दुप्पट चाचण्या
मुंबईतही चिंताजनक गतीने रुग्णवाढ होत असल्याचे समोर आले आहे. मुंबईतील रुग्णवाढ जपान, बांग्लादेश आणि सौदी अरेबियापेक्षा जास्त असल्याचे समोर आले आहे. जपानमध्ये १,४७३ नवे रुग्ण आढळले, तर बांग्लादेशात २,१८७ नव्या रुग्णांची नोंद झाली आणि सौदी अरेबियात केवळ ३८१ नवे रुग्ण आढळले. याऊलट मुंबईत मात्र २,८७७ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे मुंबईकरांसाठी चिंता वाढली असल्याचे स्पष्ट आहे.
आता मुंबईत दररोज ५० हजार चाचण्या घेण्याचं नवं लक्ष्य ठरविण्यात आले आहे. त्याबरोबरच काही रेल्वे स्थानकांत देखील चाचणी केली जाणार आहे. वांद्रे, दादर, अंधेरी, कुर्ला, मुंबई सेंट्रल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकांवर देखील प्रवाशांची चाचणी केली जाणार असल्याचे सांगितलं जात आहे. यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची आणि निर्बंध कसोशीने पाळण्याची गरज निर्माण झाली आहे.