मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा मुंबईची तुंबई झालेली आहे. पालिका प्रशासनाचे पाणी न साठण्याचे दावे फोल ठरले आहेत. मुंबईतील नदीपात्रात भराव टाकल्याने पालिका प्रशासनाचा गलथान कारभार आता समोर आलेला आहे. मुंबईमधील तब्बल २७१ नवीन ठिकाणी आता पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे. ग्रॅन्टरोड, वरळी, वांद्रे पश्चिम, अंधेरी परिसरात आता नव्याने पाणी साठण्यास सुरुवात झालेली आहे. मुंबईतील नदीपात्रातील भराव हे मुख्य कारण पाणी तुंबण्याचे आहे. तसेच मेट्रो कारशेडच्या जागेतही मोठ्या प्रमाणात भराव घालण्यात आलेला आहे. नद्यांच्या दोन्ही बाजूंना बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंती यामुळे आरेमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचले होते. तसेच बांधकामाचा राडारोडा अडकल्यामुळे पर्जन्य जलवाहिन्या बुजल्या आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा वेळीच होऊ शकत नाही.
गेल्या दोन वर्षांपासून मुंबईमध्ये पावसाचे पाणी तुंबण्याच्या ठिकाणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. गेल्या पावसाळ्यात ज्या ठिकाणी कधी पाणी भरले नाही, अशाही ठिकाणी पाणी भरले होते. ग्रॅन्टरोड, वरळी, वांद्रे, सांताक्रूझ, अंधेरी या परिसरांत सर्वाधिक पाणी साचण्याची नवी ठिकाणे आढळून आली आहेत. गेल्यावर्षीच्या पावसात मंत्रालय, मुंबई विद्यापीठ आणि उच्च न्यायालय, गिरगाव चौपाटी या भागांमध्ये पावसाचे पाणी साचले होते. एवढेच नाही तर, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीतही अनेक ठिकाणी पाणी साचले होते.
हे ही वाचा:
सीएएमुळे मुस्लिमांना कसलाही धोका नाही
टाळेबंदीचा झाला धारावीला ‘दुप्पट’ फायदा; बैठ्या घरांवर चढले दोन मजले
चिपळुणात पूरपरिस्थिती, कोकणात हाहाकार
आजतककडून अभिनेता उमेश कामतची बदनामी
हिंदमाता पूरस्थितीवर उत्तर शोधण्यात अजूनही महापालिका यशस्वी झालेली नाही. असे असताना, शहरातील नवीन ठिकाणे आता पाण्यासाखाली जाऊ लागली आहेत. पाणी तुंबले की, अतिवृष्टीला जबाबदार धरणारे प्रशासन कुचकामी ठरले आहे. गेल्या कित्येक वर्षात महापालिका शिवसेनेच्या हातात असतानाही अजूनही, या मूलभूत प्रश्नावर तोडगा मात्र निघाला नाही हे महापालिकेचे सपशेल अपयश आहे.