आय.आय.टी दिल्लीच्या ‘सेंटर फॉर रुरल डेव्हलपमेंट आणि टेक्नॉलॉजीने’ विकसीत केलेल्या सिंचनाच्या नव्या उपकरणामुळे वाळवंटीय क्षेत्रात राहणाऱ्या शेतकऱ्यांना सिंचनाची नवी पध्दत खुली झाली आहे.
कोरोना महामाहीच्या काळात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे अनेक गरीब शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेकांचा रोजगार बुडाल्याने त्यांच्या खानपानाची मोठीच आबाळ झाली. शेतकऱ्यांच्या मुलांचे कुपोषण, उपासमार टाळण्यासाठी जुन्या सिंचन उपकरणात काही बदल करून वेगळ्या तऱ्हेच्या सिंचनाची उपलब्धता करून दिली आहे.
शंकुच्या आकाराचे मातीचे भांडे वापरून जमीनीच्या वरच्या स्तरातून पाणी घेऊन त्याचा वापर घरगुती वापरासाठी पिके घेण्याकरिता केला जाईल. हे भांडे बनविण्यासाठी गावातील स्थानिक कुंभारांची मदत घेण्यात येईल. अशा प्रकारे मिळणाऱ्या पाण्यावर पालक, वांगी, टॉमॅटो, भेंडी यांसारख्या पिकांचे उत्पादन घेतले जाऊ शकेल.
जोधपुर मधील रुपयान संस्थेच्या सहकार्याने जोधपुरमधील मोकलावास या छोट्या खेड्यात प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. द हिंदू या वृत्तपत्रात याबाबत सविस्तर अहवाल प्रसिध्द झाला आहे.