जम्मू आणि काश्मिरच्या विभाजनानंतर लेह आणि लडाख प्रांताला स्वतंत्र केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. या विभागाचा उर्वरित देशाशी असलेला संबंध सुधारण्यासाठी या प्रदेशामध्ये चार नवे विमानतळ आणि ३७ नवे हेलिपॅड बनवण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारने दिलेल्या माहितीनुसार त्याठिकाणी चार नव्या विमानतळांसाठी जमिन शोधली आहे. हे विमानतळ मोठ्या आकाराच्या विमानांच्या हाताळणीसाठी सक्षम असणार आहे. त्याबरोबरच लेह शहरासाठी नव्या विमानतळाची सोय करण्यात येणार आहे, त्याबरोबरच झंस्कार खोऱ्याशी देखील थेट संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
याशिवाय भारत सरकारचा पँगाँग त्सो तलावाच्या जवळ चांगतांग या भागात देखील दळणवळणाच्या सुविधा वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. पँगाँग त्सो तलावाच्या जवळच असलेल्या सीमा भागातच चीन आणि भारत एकमेकांसमोर ठाकले होते. याच परिसरात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने घुसखोरीचा प्रयत्न केला होता. त्यामुळे चीनचा घुसखोरी अजेंडा उघड झाला होता.
हे ही वाचा:
‘या’ शिवसेना नेत्यामागेही लागला ईडीचा ससेमिरा
श्रावणात यंदाही व्यावसायिकांची वणवण
या दोन भागांसोबतच कारगिलची सुरक्षा देखील वाढवण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्नशील आहे. कारगिल भागात आधीपासून हवाई दलाचा विमानतळ अस्तित्वात आहे. त्याच जवळ नागरी वाहतूकीसाठी दुसरा नागरी विमानतळ चालू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. कारगिलचा सध्याचा विमानतळ केवळ हवाई दलातर्फेच वापरला जातो.
विमानतळासोबतच भारत सरकार संपूर्ण लडाख प्रांतात ३७ हेलिपॅड्स बनवत आहे. ही सर्व सध्या निर्माणाधीन आहेत. त्यामुळे लडाखच्या अंतर्गत भागात देखील संपर्क प्रस्थापित केला जाऊ शकेल. तयार झाल्यानंतर या हेलिपॅडवरून चिनुक सीएच ४७ सारख्या अवजड हेलकॉप्टरची हाताळणी देखील केली जाऊ शकेल. त्याशिवाय या हेलिपॅड्सचे वैशिष्ट्य म्हणजे, हे संपूर्ण वर्षभर चालू राहू शकतील.