भारत सरकारने ४९६० रणगाडे विरोधी क्षेपणास्त्र (अँटी टॅंक मिसाईल) खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी कंपनी असलेल्या भारत डायनॅमिक्स लिमीटेड या कंपनीकडून ही क्षेपणास्त्र ११८८ कोटी रुपयांना विकत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या तीन वर्षांमध्ये हे क्षेपणास्त्र भारतीय सैन्याच्या ताफ्यात सामील होतील.
ही क्षेपणास्त्र १८५० मीटर लांबीवरूनसुद्धा शत्रूवर मारा करू शकतात. यामुळे पर्वतीय प्रदेशांमध्येही शत्रूची नजर चुकवून शत्रूवर मारा करणे सहज शक्य होणार आहे. ही क्षेपणास्त्रे जमिनीवरून हल्ला करू शकतातच, परंतु त्याचबरोबर या क्षेपणास्त्रांना सैन्याच्या वाहनाला जोडून देखील मारा करता येऊ शकतो. या क्षेपणास्त्रामुळे भारताच्या, रणगाड्यांविरोधी लढण्याच्या सज्जतेला बळ मिळणार आहे.
हे ही वाचा:
मनसुख हिरेन यांच्या मृतदेहाच्या जागी अजून एक मृतदेह
अमेरिकेचे संरक्षणमंत्री भारतात
प्रे: इमिग्रेशन, इस्लाम ॲंड दी इरोजन ऑफ विमेन्स राईट्स
लवकरच ठाकरे सरकारचं तेरावं घालावं लागेल- अतुल भातखळकर
२०२० साली मे महिन्यात गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसेनंतर भारत आणि चीनच्या सैन्याने एकमेकांविरुद्ध तैनाती केली होती. भारत आणि चीनचे रणगाडे एकमेकांविरुद्ध उभे ठाकले होते. यावेळी भारताकडे रणगाडे विरोधी क्षेपणास्त्रांची कमतरता होती. त्यामुळे या परिस्थितीचा विचार करून ही कमतरता दूर करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. या क्षेपणास्त्रांच्या खरेदीमुळे आता चीनच्या रणगाड्यांचा सामना करण्यासाठी भारताकडे तुल्यबळ क्षेपणास्त्रांची मुबलकता असणार आहे.
या क्षेपणास्त्रांच्या खरेदीमुळे चीनला भारतीय सीमांमध्ये घुसखोरी करण्यापूर्वी अनेकवेळा विचार करावा लागणार आहे.