अभिजीत गंगोपाध्याय यांनी मंगळवारी कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच त्यांनी राजकारणात जाण्याचा आणि भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांच्या या निर्णयामुळे सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने त्यांच्यावर तीव्र शब्दांत टीका करून त्यांनी न्यायाधीश म्हणून घेतलेल्या निर्णयाच्या निष्पक्षपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र गंगोपाध्याय यांनी ‘मी न्यायाधीश म्हणून राजकीयदृष्ट्या पक्षपाती निर्णय कधीच दिला नाही’ असे स्पष्टीकरण दिले आहे.
‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत अभिजीत गंगोपाध्याय यांनी याबाबत भाष्य केले. ‘येथे कोणताही नैतिक औचित्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण मी न्यायाधीश म्हणून कधीही राजकारण केलेले नाही. मी कधीही राजकीयदृष्ट्या पक्षपाती निर्णय दिला नाही. मी जे काही आदेश दिले, ते नेहमी माझ्यासमोर ठेवलेल्या तथ्यांच्या आधारावर होते,’ असे गंगोपाध्याय यांनी स्पष्ट केले. ‘जर कोणी अत्यंत भ्रष्ट असेल आणि त्यांचा भ्रष्टाचार न्यायाधीशांसमोर उघडकीस आला तर न्यायाधीश नेहमीच या भ्रष्टाचाराचा योग्य तपास संस्थांद्वारा तपास व्हावा, म्हणून प्रयत्न करेल. मी तेच केले आहे. ते निर्णय कोणाच्याही पक्षाच्या बाजूने नव्हता,’ असेही ते म्हणाले.
तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनाही त्यांनी लक्ष्य केले. ‘मला आश्चर्य वाटते की, पश्चिम बंगाल राज्याने मी राजकीय व्यक्ती आहे आणि मी राजकीय निर्णय घेत होतो, असा उल्लेख न करता माझ्याद्वारे पारित केलेल्या सर्व आदेशांना आव्हान का दिले? असा प्रश्न त्यांनी कधीही अपीलीय न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयासमोर उपस्थित केला नाही. आता ते प्रश्न उपस्थित करत आहेत कारण त्यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून जनतेचे मन दुसरीकडे वेधायचे आहे,’ असा दावा त्यांनी केला.
मुलाखतीत, गंगोपाध्याय यांनी खुलासा केला की, कोणत्याही राजकीय पक्षात सामील होण्याचा त्यांचा कधीच हेतू नव्हता. पण, मला असे दिसून आले की लोक मला आव्हान देत आहेत आणि मला राजकीय क्षेत्रात आमंत्रित करत आहेत, मग मी का जाऊ नये?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
हे ही वाचा :
ईडीच्या समन्सकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी अरविंद केजरीवालांना न्यायालयाकडून समन्स
पंतप्रधानांची दक्षिण मोहीम; भाजपला ३० जागा मिळण्याची शक्यता
मलाही मुसेवाला-नफेसिंगप्रमाणे मारतील!
न्यायाधीशावरून राजकारणी होण्याबाबत त्यांना विचारले असता गंगोपाध्याय म्हणाले, “मी सात दिवसांच्या रजेवर होतो आणि रजेच्या शेवटी भाजपने माझ्या एका मित्राच्या माध्यमातून संपर्क साधला. काही मित्रांमार्फत मी भाजपशी संपर्कही साधला – आम्ही पहिल्यांदा एकमेकांशी बोललो आणि त्यानंतर मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. तीन-चार दिवसांच्या चर्चेनंतर याबाबत निर्णय झाला, असे त्यांनी स्पष्ट केले.