‘नेटफ्लिक्स’वर आलेली कंदहार विमान अपहरणाच्या घटनेवर आधारीत असलेली ‘IC814- द कंदहार हायजॅक’ ही वेबसिरीज वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या वेबसिरीजमध्ये दहशतवाद्यांची नावे हिंदू धर्मीयांशी निगडीत असल्याचे दाखवण्यात आले आहे. यावरून नव्या वादाला तोंड फुटले असून यावर आक्षेप घेण्यात आला आहे. याची दखल आता थेट माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने घेतली आहे तसेच नेटफ्लिक्सला समन्स बजावले आहे.
‘IC814- द कंदहार हायजॅक’ ही वेबसिरीज सत्य घटनेवर आधारीत आहे. २४ डिसेंबर १९९९ रोजी भारतीय प्रवाशांना काठमांडू ते दिल्ली घेऊन जाणाऱ्या इंडियन एअरलाइन्सच्या IC814 या विमानाचे अपहरण करण्यात आले होते. या विमानाला पाकिस्तानातील काही दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलं होतं. विमानातील सशस्त्र दहशतवाद्यांनी विमानाचा ताबा घेत विमानाला दिल्ली या नियोजित गंतव्याऐवजी अमृतसर, लाहोर, दुबई मार्गे अफगाणिस्तानात कंदहार येथे नेले. पुढे ओलीस प्रवाशांच्या सुटकेसाठी तत्कालीन भारत सरकारने तीन दहशतवाद्यांची सुटका केली होती. या प्रकरणावर ‘Flight Into Fear: The Captain’s Story’ हे पुस्तक पत्रकार श्रीनिजॉय चौधरी आणि अपहरण झालेल्या विमानाचे कॅप्टन देवी शरण यांनी लिहिले. या पुस्तकाच्या आधारे ‘IC814- द कंदहार हायजॅक’ ही वेबसिरीज तयार करण्यात आली.
दरम्यान, वेबसिरीजमध्ये दहशतवाद्यांची नावेच बदलण्यात आली आहेत. त्यामुळे या गोष्टीवर आक्षेप घेण्यात आला आहे. मुसलमान असलेल्या या दहशतवाद्यांची नावं बदलून हिंदू करण्यात आली आहेत. विमान हायजॅक करणाऱ्या दहशतवाद्यांची नावे मुस्लीम नावांशी संबंधित असताना वेबसिरीजमध्ये हे दहशतवादी एकमेकांना शेफ, बर्गर, डॉक्टर, शंकर, भोला या नावांनी संबोधित आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर हा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे.
Netflix Content Head has been summoned tomorrow by the Ministry of Information & Broadcasting over the 'IC814' web series content row: Sources
— ANI (@ANI) September 2, 2024
हे ही वाचा:
बांगलादेशात दुर्गापूजेसाठी बनवण्यात आलेल्या मूर्तीचे विटंबन
निषाद कुमारची २.०४ मीटर ‘उंच उडी’ मारत रौप्य पदकाला गवसणी
पॅरालिम्पिकमध्ये प्रीती पालने पटकावले आणखी एक कांस्य पदक
ममता दीदी भेट देईनात, टीएमसी प्रदेशाध्यक्षाचा राजीनामा
दरम्यान, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नेटफ्लिक्सच्या कंटेंट हेडना मंगळवार, ३ सप्टेंबर २०२४ रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. IC814 या वेब सीरिजवरून नेटफ्लिक्स कंटेंट हेडना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे समन्स धाडले आहे. या वेबसिरीजमधून नेटफ्लिक्सने दहशतवाद्यांची मुस्लिम नावे जाणीवपूर्वक लपवल्याचा आरोप करण्यात येत आहे.