महाराष्ट्र देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ४ ऑक्टोबर रोजी काँग्रेसकडून जितेश अंतापूरकर यांच्या नावाची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली. तर अंतापूरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यामुळे काँग्रेसवर पुन्हा एकदा घराणेशाहीचा आरोप होताना दिसत आहे.
नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना काळात निधन झाल्यामुळे हा मतदारसंघ रिक्त झाला होता. त्यामुळे या मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली होती. काँग्रेसकडून या निवडणुकीच्या रिंगणात कोणाला उतरवले जाणार याबाबत खूपच उत्सुकता होती. ४ ऑक्टोबर रोजी काँग्रेस पक्षातर्फे या निवडणुकीसाठी जितेश अंतापूरकर यांची उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली. तर त्या सोबत आसामच्या पोटनिवडणुकांसाठीही काँग्रेस उमेदवारांची घोषणा केली आहे.
देगलूर बिलोली मतदार संघाचे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव आहेत. म्हणूनच काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी जाहीर केल्याचे म्हटले जात आहे. तर जितेश यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे काँग्रेस मधील घराणेशाहीबद्दल पुन्हा एकदा कुजबुज रंगताना दिसत आहे.
हे ही वाचा:
ईडीसमोर हजर राहण्यासाठी भावना गवळींना हवे अजून १५ दिवस!
मुंबई पालिका म्हणतेय, छट्, तिसरी लाट वगैरे काही येणार नाही!
‘स्वतःच्या मुलाला काही शिकवले नाही, तुमच्या चाहत्यांच्या मुलांना कसे शिकविणार’
…म्हणून व्हाॅट्सॲप, फेसबुक झाले होते बंद
भाजपाकडून या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून सुभाष साबणे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. साबणे हे देगलूर बिलोलीचे माजी आमदार राहिले आहेत. तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ते शिवसेना-भाजपा युतीचे अधिकृत उमेदवार देखील होते. त्यामुळे देगलूर बिलोलीची ही पोटनिवडणूक खूपच रंगतदार होणार असे दिसत आहे. भाजपाकडून तर पंढरपुरची पुनरावृत्ती देगलूरमध्ये होणार असल्याचेही सांगितले जात आहे.