तो क्षण वेगळाच होता. त्यांचा मुलगा पहिल्यांदाच वडिलांसोबत कामाच्या ठिकाणी आला होता. मात्र वडिलांचा हेतू त्यांच्या मुलाला कामासाठी प्रेरणा देण्याचा नव्हता. कारण ते कामच जोखमीचे होते. एव्हरेस्ट शिखरावर सर्वाधिक चढाई करण्याचा विक्रम करणारे कामी रीता शेर्पा हे मार्गदर्शक आपल्या २४ वर्षीय मुलगा लाक्पा तेनझिंग याच्या सोबत भव्य शिखराच्या पायथ्याशी आले होते. सन २०२१च्या उत्तरार्धाचा तो काळ होता. तेव्हा त्यांनी मुलाला सल्ला दिला होता, ‘हा एक संघर्ष आहे. माझ्याकडे पाहा. मला यात भवितव्य दिसत नाही.’ ही परिस्थिती येथील अनेक कुटुंबाची झाली आहे. विपरित परिस्थितीमुळे अनेक शेर्पा त्यांचा पारंपरिक व्यवसाय सोडण्याच्या मनस्थितीत आहेत.
एव्हरेस्ट या जगातील सर्वोच्च शिखरावर मार्गदर्शन करण्यासाठी शेर्पा कुटुंब सदैव सज्ज असतात. या दरम्यान असंख्य धोक्यांचा त्यांना सामना करावा लागतो. बर्फवृष्टी, हिमस्खलन आणि कठोर हवामानाशी त्यांना दोन हात करावे लागतात.
पर्वतारोहणाच्या नोंदी ठेवणाऱ्या ‘हिमालयन डेटाबेस’नुसार, गेल्या शतकात एव्हरेस्टवर नोंदल्या गेलेल्या ३१५ मृत्यूंपैकी जवळपास एक तृतीयांश मृत्यू हे शेर्पा मार्गदर्शकांचे झाले आहेत.
गेल्या महिन्यात, डोंगराच्या बेस कॅम्पजवळील हिमनदीवर बर्फाच्या ढिगाऱ्याला धडकून तीन शेर्पा मरण पावले. अनेक वर्षांच्या खडतर आणि यशस्वी चढाईनंतर उच्चभ्रू मार्गदर्शकांच्या क्लबमध्ये प्रवेश मिळवणाऱ्या या शेर्पांना पगारही माफक आहे. त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात शेर्पा त्यांच्या एव्हरेस्ट मोहिमेसाठी सुमारे चार हजार डॉलर कमावतात. अर्थात हा मोसम वर्षातून एकदाच असतो. त्यांच्या वार्षिक उत्पन्नातील सर्वांत मोठा वाटा याच कमाईचा असतो.
परंतु बहुतेक शेर्पा हा पारंपरिक व्यवसाय सोडू इच्छितात, त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अपुरी सुरक्षा. एखादा शेर्पा अपंग किंवा त्याचा मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबासाठी थोडीशी वेगळी सुरक्षाव्यवस्था आहे. विम्याची व्यवस्था आहे, परंतु ती मर्यादित आहे. शिवाय, सरकारने जाहीर केलेला सरकारी कल्याण निधी अद्याप कागदावरच आहे. त्यामुळे अनेकजण परदेशात स्थलांतरित होत आहेत. इतरजण नेपाळमध्येच जे काही काम मिळेल ते करत आहेत. ‘मी कष्टाने वाढवलेल्या माझ्या मुलांना त्याच धोकादायक मार्गाने चालण्याचे सुचवणार नाही,” असे काजी शेर्पा सांगतात.
काजी यांनी शेर्पा मार्गदर्शक म्हणून आठ वर्षे काम केल्यानंतर सन २०१६मध्ये हा व्यवसाय सोडला. ते आता सुरक्षारक्षकाची नोकरी करतात.
२०१४मध्ये झालेल्या हिमस्खलनाने १६ शेर्पा मारले गेले होते. या भयंकर संकटातून काजी शेर्पा थोडक्यात बचावले होते. ज्यांनी हा पर्वतराजींचा मार्ग सोडला, त्यात आपा शेर्पा हे प्रसिद्ध मार्गदर्शकही आहेत. त्यांच्या नावावर एव्हरेस्टची सर्वाधिक शिखरे चढण्याचा विक्रम होता. तो नंतर कामी रिता शेर्पा यांनी मोडला. आपा शेर्पा आता ६३ वर्षांचे आहेत. ते २००६मध्ये अमेरिकेत गेले. आता तिथेच त्यांचे कुटुंब स्थायिक झाले आहे.
हे ही वाचा:
‘द केरळा स्टोरी’ला विरोध करणारे आयसीसचे समर्थक
अमृतसरमध्ये पुन्हा स्फोट, घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त
ऑपरेशन कावेरी म्हणजे ‘इंडिया फर्स्ट’ धोरणाचा डंका
राहुल म्हणजे एकदिवस सद्दाम, दुसऱ्या दिवशी अमूल बेबी
‘हे सर्व काही शिक्षणासाठी आहे,’ आपा शेर्पा यांचा मोठा मुलगा तेनझिंग सांगतो. तो बायोटेक फर्ममध्ये अकाउंटंट आहे. ‘माझे बाबा आणि आई दोघेही शिक्षणापासून वंचित होते. त्यामुळे त्यांनी डोंगरात खूप कष्ट केले,’ असे तेनझिंगने सांगितले. कामी रिता शेर्पा यांचा २४ वर्षीय मुलगा लकपा सध्या पर्यटन व्यवस्थापनातील पदवी शिक्षण पूर्ण करत आहे. ‘मला लँडस्केप फोटोग्राफर होण्याची इच्छा आहे म्हणजे मी पर्वतापासून दूर राहूनही त्याच्या समीप राहीन,’ वेगळी वाट निवडणारा लकपा सांगतो.