नीट परीक्षा घोटाळ्याप्रकरणी एटीएस आणि लातूर पोलिसांनी कारवाई करत चौघांना अटक केली आहे. या प्रकरणी दोन शिक्षकांची काल (२३ जून) एटीएस पथकाने चौकशी केली होती. संजय तुकाराम जाधव आणि जलील उमरखान पठाण अशी चौकशी करण्यात आलेल्या शिक्षकांची नावे आहेत. चौकशीनंतर दोघांनाही सोडण्यात आले होते. परंतु, पोलिसांनी कारवाई करत दोघांनाही अटक केली. यांच्यासह धाराशिव मधील एक आणि दिल्लीमधील एकाला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लातूर, धाराशिव आणि दिल्ली असे तीन शहरांशी जोडणारे हे प्रकरण आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेला जलील उमरखान पठाण आणि संजय तुकाराम जाधव हे विध्यार्थांकडून पैसे घ्यायचे आणि विद्यार्थ्यांना नीट परीक्षेत पास करण्याचे आश्वासन द्यायचे. एटीएस पथकाला याची संपूर्ण माहिती मिळाली आहे. तसेच दोन्ही शिक्षकांच्या मोबाईलमध्ये काही विद्यार्थ्यांचे ऍडमिट कार्ड देखील मिळाले आहेत. याशिवाय त्यांच्या बँक खात्यावरून मोठ्या रकमेचे व्यवहार झाल्याचेही तपासात दिसून आले आहे.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींनी लोकसभेच्या सदस्यत्वाची घेतली शपथ!
जरांगे म्हणतायत, मुस्लिमांना आरक्षण द्या, नाहीतर बघून घेतो!
छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ला, सीआरपीएफचे दोन जवान हुतात्मा!
धक्कादायक! पुण्यातील नामांकित हॉटेलमध्ये ड्रग्सची विक्री?
या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत संजय तुकाराम जाधव, जलील उमरखान पठाण, धाराशिवमधील इरान्ना मशनाजी कोंगलवार आणि दिल्लीमधील गंगाधर नामक व्यक्तीला अटक केली आहे. या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून महाराष्ट्र एटीएस पथक आणि लातूर पोलीस अधिक तपास करत आहेत.