शेवट ‘गोल्ड’ झाला

शेवट ‘गोल्ड’ झाला

टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये भारताच्या खात्यात आणखीन एक पदक जमा झाले आहे आणि ते देखील सुवर्ण पदक. पुरुषांच्या भालाफेक या क्रीडा प्रकारात भारताचा ऍथलिट नीरज चोप्रा याने भारतासाठी पदकाची कमाई केली आहे. निरजची ही कामगिरी ऐतिहासिक स्वरूपाची आहे. कारण ऑलिम्पिक स्पर्धेला सुरवात झाल्यापासून आजवरचे ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारातील भारतासाठीचे हे पहिले पदक आहे.

भाला फेक या क्रीडा प्रकाराच्या अंतिम फेरीला शनिवार ७ ऑगस्ट रोजी सुरुवात झाली. भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८७.०३ मीटर लांब भाला फेकून सुवर्ण पदकासाठी आपली दावेदारी मजबूत केली. तर दुसऱ्या प्रयत्नात त्याहीपेक्षा पुढे म्हणजेच ८७.५८ मीटरवर भाला फेकला. भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत सर्वात लांब फेकलेला हा भाला ठरला. या संपूर्ण फेरीत नीरज व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही देशाच्या स्पर्धकाने ८७ मिटर पलीकडे भाला फेकला नाही. त्यामुळे नीरजच्या सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब झाले. टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये भारताचे हे पहिले सुवर्णपदक ठरले आहे तर एकूण सातवे पदक ठरले आहे.

हे ही वाचा:

तालिबानने एक शहरही काबीज केले

दरडग्रस्तांना मदत करण्यात ठाकरे सरकार अपयशी

बजरंगमुळे ब्रॉंझरंग

राऊत यांचा मेजर ध्यानचंद यांच्या नावाला विरोध आहे का?

नीरज चोप्राचा टोकियो ऑलिम्पिक २०२० मधला प्रवास सुरूवातीपासूनच आश्वासक राहिला आहे. ४ ऑगस्ट रोजी झालेल्या भालाफेक प्रकारातील पात्रता फेरीत अ गटात नीरज चोप्रा खेळत होता. त्यावेळी ८६.६५ मीटरवर भाला फेकत नीरजने अंतिम फेरीतील आपले स्थान पक्के केले. यावेळीसुद्धा त्याच्या गटातील सर्वात लांब भाला फेकणारा तो खेळाडू ठरला.

नीरजच्या या कामगिरीने साऱ्या भारत देशाची मान अभिमानाने उंचावली असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करत नीरजचे अभिनंदन केले आहे.

Exit mobile version