नुकत्याच होऊन गेलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने आत्तापर्यंतची सर्वात यशस्वी कामगिरी करून दाखवली आहे. भारताने तब्बल ७ पदके जिंकली आहेत. यामध्ये १ सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्य पदकांचा समावेश आहे. या ऑलिम्पिकमध्ये भारताने यंदा सर्व प्रकारची पदके जिंकली आहे.
भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ऑलिम्पिकमधील सर्व सहभागी खेळाडूंना लाल किल्ल्यावरील ध्वजारोहण कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व खेळाडूंचे स्वागत आणि अभिनंदन केलं. कार्यक्रमानंतर त्यांनी सर्व भारतीय खेळाडूंची भेट घेतली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणाऱ्या नीरज चोप्राला त्यांनी चुरमा खायला दिला. तसेच कांस्य पदक विजेती बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूला आईस्क्रीमची पार्टीही दिली. ऑलिम्पिक इतिहासात दोन पदके जिंकणारी सिंधू पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
हे ही वाचा:
‘या’ विमा कंपनीचे होणार खासगीकरण
अफगाणिस्तानच्या पतनाला कोण जबाबदार?
लोकल प्रवासासाठी ‘या’ लसीला अधिक मागणी
पंतप्रधानांनी अॅथलेटिक्समध्ये भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राला चुरमा खायला दिला. यावेळी त्याच्याशी मनमोकळ्या गप्पाही मारल्या. त्यानंतर मोदींनी सिंधूला दिलेलं वचनही पूर्ण केलं आणि तिच्यासोबत आईस्क्रीम खाण्याचा आनंद लुटला. ऑलिम्पिकला जाण्यापूर्वी पंतप्रधानांनी भारताच्या सर्व खेळाडूंशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी जर पदक घेऊन परत याल, तेव्हा आईस्क्रीम खायला देईन, असं वचन स्टार बॅडमिंटनपटू सिंधूला दिलं होतं.
भारताला ४१ वर्षानंतर हॉकीमध्ये पदक मिळाले. या खेळाडूंनाही पंतप्रधान मोदींनी एक विशेष भेट दिली. भारतीय पुरुष संघातील सर्व खेळाडूंना पंतप्रधान मोदींची ऑटोग्राफ असणारी हॉकी स्टिक भेट म्हणून देण्यात आली. यावेळी त्यांनी कुस्तीमध्ये रौप्य पदक पटकावणाऱ्या रविकुमार दहिया, कांस्य पदक विजेत्या बजरंग पुनिया, विनेश फोगट, सोनम मलिक आणि दीपक पुनिया या कुस्तीपटूंसोबतही बराच वेळ घालवला. ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व पदक विजेते आणि सहभागी खेळाडू लाल किल्ल्यावर जमले होते. त्या आधी त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह भोजनाचा आनंद घेतला होता.