दिल्लीत पार पडलेल्या मराठी साहित्य संमेलनात विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर दोन मर्सिडीज कार दिल्या की पद मिळतात असा आरोप केला होता. त्यावर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असताना आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गोऱ्हे यांनी हे वक्तव्य करण्याची गरज नव्हती असे सांगून आपली भूमिका मांडली. खासदार संजय राऊत यांनी याबद्दल गोऱ्हे यांच्यावर टीका करत असताना शरद पवार यांनी सुद्धा यावर भाष्य करण्याचे आवाहन केले होते.
पवार यांनी सोमवारी सायंकाळी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले, नीलम गोऱ्हे या चार वेळा विधीमंडळात कशा गेल्या हे राज्याला माहित आहे. सुरुवातील प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत नंतर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत त्या आहेत. इतक्या मर्यादित काळात त्यांनी इतके पक्ष बदलले. त्यांना साहित्य संमेलनाच्या ठिकाणी येऊन असे भाष्य करण्याची गरज नव्हती, असे पवार म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे पुरस्कार पवार यांच्या हस्ते देण्यात आला होता त्यावर संजय राऊत यांनी टीका केली होती. पवारांनी हा पुरस्कार द्यायला नको होता. त्यावर बोलताना ते म्हणाले आता कुणाला पुरस्कार द्यायचा हे मला कोणी सांगावे का ? असा खोचक सवाल त्यांनी केला.
हेही वाचा..
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंकजा मुंडे, अक्षय कुमार, कैटरीना कैफ यांनी संगमात केले स्नान!
इरा जाधव, अनिरुद्ध नंबुद्रीने जिंकले सुवर्णपदक
बांगलादेशमधील हवाई दलाच्या तळावर हल्ला; एकाचा मृत्यू
दहशतवादी करणार होते चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आलेल्या परदेशी पाहुण्यांचे अपहरण
बीड जिल्ह्यातील मस्साजोग प्रकरणावर बोलताना ते म्हणाले, या प्रकरणात गेल्या इतक्या दिवसापासून ज्यांच्यावर आरोप होत आहेत (मंत्री धनंजय मुंडे) त्यांनी सत्तेत बसून राहणे योग्य नाही. यापूर्वी ज्यांच्यावर आरोप झाले ते सत्तेतून बाहेर पडले. ज्यांना आत्मसन्मान आहे अशी व्यक्ती सत्तेत बसणार नाही, असा टोलाही पवार यांनी लगावला.
पवार म्हणाले, दिल्लीत तीन दिवस झालेल्या मराठी साहित्य संमेलनासाठी देशभरातून मराठी भाषिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. हे संमेलन यशस्वीपणे पार पडले. दिल्लीत असे संमेलन दुसऱ्यादा पार पडले. पहिल्या अधिवेशनाचे उद्घाटन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले होते. तेव्हा काकासाहेब गाडगीळ हे स्वागताध्यक्ष होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले आणि आपण स्वागताध्यक्ष होतो. दोन टप्यात संमेलन झाले, असे ते म्हणाले. संमेलनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर यांचे भाषण दिशादर्शक ठरले असेही ते म्हणाले.