आणि एनडीटीव्हीचा बुरखा फाटला

पत्रकारितेच्या ऱ्हासास माध्यमांची दुटप्पी भूमिका कारणीभूत

आणि एनडीटीव्हीचा बुरखा फाटला

झारखंडमध्ये अंकिता नावाच्या एका मुलीला शाहरुख हुसेन या मुलाने तिच्या घरातच जाळून मारल्याची घटना घडली. त्यातून झारखंडमध्ये प्रचंड असंतोष उफाळून आला. आपल्याशी मैत्री करावी, संबंध ठेवावेत म्हणून हा शाहरुख अंकिताचा छळ करत होता. खरे तर ती त्याची शेजारी. पण त्याने तिच्यापाठी लकडा लावला होता. तिने त्याला नकार दिला, त्याला स्पष्ट शब्दांत सुनावलेही. पण त्याने तिला मारण्याची धमकी दिली आणि नंतर ती घरात झोपलेली असताना तिच्यावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. त्यात तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे झारखंडमध्ये तणावाचे वातावरण आहे. या घटनेचे अनेक माध्यमांमध्ये असेच वृत्त प्रसिद्ध झाले. पण काही माध्यमे या व अशा बातम्यांचे वार्तांकन करताना फसवा दृष्टिकोन ठेवतात. एनडीटीव्ही हे यातीलच एक चॅनेल. ही बातमी देताना त्यांनी ट्विट केले की, एका कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलीला तिचा सतत छळ करणाऱ्या मुलाने जिवंत जाळले. ही बातमी अशा पद्धतीने द्यायला हरकत नाही. पण हेच एनडीटीव्हीसारखे चॅनेल अशा बातम्यांच्या बाबतीत कशी दुटप्पी भूमिका बाळगते हे यानिमित्ताने पुढे आले.

२०१७मध्ये झारखंडमध्येच अशीच एक घटना घडली होती. फक्त त्या घटनेत एका हिंदू मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणामुळे एका मुस्लिम युवकाची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी याच एनडीटीव्हीने हिंदू युवतीशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणामुळे मुस्लिम युवकाची हत्या असा मथळा असणारे वृत्त दिले होते. हा दुटप्पीपणा नाही का? हिंदू मुलीची मुस्लिम युवकाने हत्या केली तर त्या बातमीच्या मथळ्यात दोन्ही धर्मांचा उल्लेख नाही. पण हिंदू मुलीशी प्रेमसंबंध ठेवल्याबद्दल मुस्लिम युवकाची हत्या या बातमीचा मथळा देताना मात्र दोघांच्या धर्माचा उल्लेख.

एनडीटीव्ही सारख्या चॅनेलने असे करण्यामागचे कारण काय? मुस्लिम युवकाची हत्या झाली तर धर्म दाखवायचा पण हिंदू युवकाची किंवा युवतीची हत्या झाली तर धर्माचा उल्लेखही नाही. याचे कारण म्हणजे मुस्लिमांचे लांगूलचालन. एकूणच देशात कसा मुस्लिमांवर अन्याय सुरू आहे, हे दाखविण्याचा हा प्रयत्न. हिंदूंवर मात्र अन्याय झाला तर त्यात हिंदू धर्माचा उल्लेखही करायचा नाही. तेव्हा मात्र आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत, अशी बतावणी करायची. धर्म निरपेक्ष आहात तर मग दोन्ही धर्मांतील पीडितांना सारखाच न्याय द्यायला हवा. पण ही अशा वाहिन्यांची वाईट खोड आहे. कारण यांना एक नरेटिव्ह सेट करायचे असते. एक ठरलेला अजेंडा असतो तो म्हणजे अल्पसंख्य असल्यामुळे मुस्लिमांवर अन्याय झाला की तो दाखवायचा पण बहुसंख्यकांवर अन्याय झाला की, त्याला धर्माचा आधार द्यायचा नाही. यामुळेच या वाहिन्यांच्या पत्रकारितेचा ऱ्हास होत गेला.

खरे तर, यांची पत्रकारिता अशाच अजेंड्यावर पोसली गेलेली आहे. मात्र मोदी सरकार येण्यापूर्वी आणि सोशल मीडियाचे वर्चस्व तयार होण्यापूर्वी ही पत्रकारिता म्हणजेच अस्सल पत्रकारिता, परखड पत्रकारिता अशा बिरुदांनी मिरविली जात होती. मात्र आता या पत्रकारितेतील फोलपणा लोकच समोर आणू लागले आहेत. मागे एका नामांकित मराठी दैनिकाने मदर तेरेसा यांच्याविरोधात अग्रलेख लिहिला होता पण व्यवस्थापनाने त्यांना तो मागे घ्यायला लावला. अग्रलेख मागे घेतला म्हणजे नेमके काय झाले ते माहीत नाही, पण त्या भूमिकेवरून त्यांनी माघार मात्र नक्की घेतली. पण तेच हिंदूंच्या बाबतीत लिहिताना, हिंदुत्वाबाबत लिहिताना किंवा त्याचे प्रक्षेपण करताना आपण कसे परखड लिहितो असा आव आणला जातो. या पत्रकारितेचे हे रूप आता लोकांना कळले आहे.

गौतम अदानी यांनी गेल्या आठवड्यात याच एनडीटीव्हीचे २९ टक्के शेअर्स खरेदी केल्याची बातमी आली आणि जणू काही देशातील पत्रकारितेवर संकट कोसळले अशा बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्या. पत्रकारितेचा गळा आता दाबला जाणार आहे, लोकशाहीच शिल्लक राहणार नाही, अशा कंड्या पिकवल्या जाऊ लागल्या. खरे तर, लांगूलचालनाच्या पत्रकारितेचा होणारा अंत यांना आता दिसतो आहे. त्यातूनच मग एनडीटीव्ही हिंदीचे पत्रकार रवीश कुमार आता चॅनेलमधून बाहेर जाणार अशा बातम्याही समोर यायला लागल्या. खरे तर या सगळ्या अशा वाहिन्यांचा भर हा मोदीविरोध हाच राहिला आहे.

हे ही वाचा:

राज्यातील अग्निवीरांची सोय राज्य सरकार करणार

काँग्रेसच्या तोंडी शिंदेगटाची भाषा

गौतम अदानी ठरले जगातील सर्वात तिसरे श्रीमंत व्यक्ती

जम्मू काश्मिरातले ६४ काँग्रेस कार्यकर्ते ‘आझाद’

 

हिंदुत्वाला विरोध करणे हाच त्यांचा अजेंडा आहे. पण लोक आता शहाणे झाले आहेत. सोशल मीडियामुळे अशा वाहिन्या आणि वर्तमानपत्रांची पोलखोल त्वरित केली जाते. हा सूर्य हा जयद्रथ अशा थाटात सगळे हिशेब चुकते केले जातात. त्यामुळे या वाहिन्या, वर्तमानपत्रे यांची विश्वासार्हता लयाला गेली आहे. मात्र मोदी सरकारमुळे आपल्यावर बंधने आल्याची आवई हे उठवत असतात. पत्रकारांना काढण्यात आले की, मोदींच्या दबावामुळे आपल्याला हटविण्यात आल्याचा कांगावा हे करू लागतात. प्रत्यक्षात यांची सद्दी संपल्यामुळेच त्यांची हकालपट्टी झालेली असते.

अंधपणे मोदींचा विरोध करण्यातून त्यांची पत्रकारिता अवघ्या ८ वर्षांत संपुष्टात आली आहे. मोदींना विरोध करता करता आपण देशविरोधीही बोलू लागलो आहोत, याचेही भान या माध्यमांना राहिलेले नाही. त्याचे परिणाम ही माध्यमे लयाला जाण्यात झाले आहे. इथे आपली चोरी पकडली जाते म्हटल्यानंतर मग न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट अशा परकीय माध्यमांमध्ये लेख आणि आपली स्तुती छापून आणण्याकडे इथल्या मोदीविरोधक राजकारण्याचा कल दिसून येतो. मुस्लिमांचे अंध समर्थन करणारी राणा अयुबसारखी तथाकथित पत्रकारही वॉशिंग्टन पोस्टमध्ये लिहिते. कारण त्यांच्या लेखनाची भारतात चिरफाड केली जाईल, याची त्यांना पुरती कल्पना आहे.

एनडीटीव्हीच्या या बातमीदारीमुळे अशा माध्यमांचा खरा चेहरा समोर आला आहे हे मात्र खरे आणि आता सोशल मीडियावरून त्यांचा हा बुरखा वारंवार फाडला जाणार आहे.

Exit mobile version