मुंबईसह राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून रविवार, २५ जून रोजी मुंबईतील विद्याविहार येथे इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी ही इमारत कोसळली. यात चौघेजण ढिगाऱ्याखाली अडकले होते. दरम्यान, दोघांना बाहेर काढण्यात यश आले होते. मात्र, या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अन्य दोघांसाठी रविवारपासून बचाव कार्य सुरू होते. त्यानंतर दोघांना बाहेर काढण्यात यश आले मात्र, दोघांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
विद्याविहार येथील तीन मजली इमारत रविवारी सकाळी खचली. सततच्या पावसामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत होते. मात्र, अडकलेल्या चौघांपैकी दोघांना वाचवण्यात यश आले तर या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या कुटुंबापैकी अलका आणि नरेश पालंडे यांना २० तासानंतर ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. मात्र, दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला.
विद्याविहार येथील ही इमारत ४० वर्षे जुनी असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, मुंबईमध्ये शनिवारपासून ठिकठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. अनेक भागात पावसामुळे पाणी साचले आहे. तब्बल २० तास एनडीआरएफकडून बचाव कार्य सुरू होते. मुंबईतील पहिल्याच पावसात या दुर्घटनेमुळे धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
हे ही वाचा:
कुस्तीगीरांचे आंदोलन मागे, मात्र आता न्यायालयाची लढाई
‘बराक ओबामांमुळे सहा मुस्लिम राष्ट्रांवर बॉम्बहल्ला’
अधिक काम करण्यासाठी ‘केदारनाथ’ यात्रेतील ”खेचरांना देतात गांजा” !
इजिप्तच्या दौऱ्यात महिलेने ‘ये दोस्ती हम नही छोडेंगे’ गाणे गात केले मोदींचे स्वागत
विले पार्ल्यात इमारत दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू
पहिल्या पावसानंतर विले पार्ले परिसरातही इमारत कोसळली. दुपारी अडीच वाजता एका इमारतीचा भाग कोसळला. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, तीन जण जखमी आहेत. ६५ वर्षीय प्रिशिला मिसाईटा आणि ७० वर्षीय रोबी मिसाईटा या दोघांचा मृत्यू झाला आहे.