राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने (एनसीपीसीआर) नेटफ्लिक्सला नोटिस पाठवून बॉंबे बेगम या वेबसिरीजचे प्रक्षेपण थांबविण्याची सूचना केली आहे. त्यांच्यावर या वेबसिरीजमध्ये मुलांचे चित्रण चुकीच्या पद्धतीने केले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आयोगाने ही कारवाई या वेबसिरीजच्या विरोधातील एका तक्रारी नंतर घेतली आहे. या तक्रारीत, या वेबसिरीजमध्ये अल्पवयीन मुलांचे लैंगिक संबंध आणि ड्रग्जचा वापर अतिशय सामान्य तऱ्हेने केला जात असल्याचे दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. आयोगाने पाठवलेल्या नोटिसमध्ये नेटफ्लिक्सला कारवाई करायला २४ तासांचा अवधी देण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यांनी या संबंधीचा विस्तृत अहवाल आयाेगाला पाठवणे बंधनकारक राहणार आहे, अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असेही सांगण्यात आले आहे.
आयोगाच्या मते, अशा प्रकारचा आशय मुलांसाठी हानिकार तर आहेच, त्याशिवाय त्यांचे शोषण होण्याची शक्यतादेखील वाढवणारा आहे. त्यामुळेच आयोगाने नेटफ्लिक्सला यासंदर्भातील नोटिस बजावली आहे.
हे ही वाचा:
‘एमपीएससी’ त नापास झालेले ठाकरे सरकार
तुम्हाला सगळे हिशेब द्यावेच लागतील- किरीट सोमय्या
नेटफ्लिक्सने मुलांबाबत अशा प्रकारचा आशय दाखवताना अधिक काळजी बाळगली पाहिजे आणि अशा प्रकारच्या गोष्टी दाखवण्यापासून स्वतःला दूर ठेवलं पाहिजे असे मत आयोगाने व्यक्त केले आहे.
माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून तांडव, मिर्जापूर या वेबसिरीज नंतर उद्भवलेल्या वादानंतर ओटीटी व्यासपीठांसाठी नियमावली जारी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर या वेबसिरीजच्या संदर्भात नेटफ्लिक्सला पाठवण्यात आलेल्या नोटिसला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.