अमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी एनसीबीने आता मोर्चा गुन्हेगारी टोळ्यांकडे वळवलेला आहे. आज अमली पदार्थविरोधी दिन असून, याच अनुषंगाने आता एनसीबीने म्हणजेच नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोने आपले ध्येय निश्चित केले आहे. मुंबईसह अनेक भागातील अमली पदार्थांचे जाळे नष्ट केल्यानंतर आता एनसीबीच्या रडारवर गुन्हेगारी टोळ्या आलेल्या आहेत. अमली पदार्थांचे खूप मोठे जाळे असून, हे जाळे एका दिवसात किंवा काही महिन्यांमध्ये नष्ट होणारे नाही. परदेशातूनही तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याने हे जाळे नष्ट करणे सोपे काम नाही.
महानगरी मुंबई ही गेल्या कित्येक महिन्यांपासून अमली पदार्थांचे केंद्रच बनलेली होती. केवळ अमली पदार्थच नाहीत, तर दलालांचा सुळसुळाटही मुंबईत मोठ्या प्रमाणावर होता. सुशांत सिंह याच्या मृत्यूनंतर अनेक कोडी उलगडू लागली. त्यानंतर एनसीबीने झाडाझडती करून अनेक अमली पदार्थ विकणारे आणि विकत घेणारे यांना ताब्यात घेतले. यामध्ये रिया चक्रवर्ती, सॅम्युएल मिरांडा, शोविक चक्रवर्ती या सर्वांमार्फत होणारा अमली पदार्थ दलालीचा चांगलाच पर्दाफाश केला होता. मागील वर्षी कसून एनसीबीकडून या सर्व रॅकेटचा कसून तपास झाला. मुंबईसह उपनगरातील हे अमली पदार्थाचे जाळे उद्धवस्त केले. त्यामुळेच आता एनसीबीने आपला मोर्चा गुन्हेगारी टोळ्यांकडे वळवलेला आहे.
हे ही वाचा:
अनिल देशमुख ११ वाजता पोहोचणार ईडी कार्यालयात
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपाचे चक्का जाम आंदोलन सुरू
कोरोनाचे ‘महाराष्ट्र मॉडेल’ जोडे मारण्याच्या लायकीचे!
एनसीबीकडून परदेशातून होणारी तस्करी आता रोखण्याचा प्रयत्न करण्यात येणारी नवीन योजनाही आखण्यात आलेली आहे, अशी माहिती एनसीबी प्रमुख समीर वानखेडे यांनी दिली.
गतवर्षी एनसीबीला मुंबईसह आसपासच्या उपनगरातील अमली पदार्थांचे जाळे नष्ट करण्यात यश आलेले आहे. तरीदेखील अजूनही अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळेच आता पुढचे पाऊल म्हणून गुन्हेगारी टोळ्यांकडे एनसीबीने लक्ष केंद्रीत केले आहे अशी माहिती यावेळी समीर यांनी दिली.