केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवार, ५ एप्रिल रोजी छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त म्हणून ओळख असलेल्या दंतेवाडा जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी आदिवासी जमातीच्या बस्तर पंडुम या उत्सवात सहभागी होत आदिवासींना शुभेच्छा दिल्या. तसेच अमित शाह यांनी नक्षलवाद्यांना शस्त्रे खाली ठेवून मुख्य प्रवाहात सामील होण्याचे आवाहन केले. मार्च २०२६ पर्यंत छत्तीसगडच्या बस्तर प्रदेशातील लाल दहशतवाद संपवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असे प्रतिपादनही अमित शाह यांनी केले.
अमित शाह म्हणाले की, “आज मी देवी दंतेश्वरीकडून आशीर्वाद घेतो आणि एक प्रतिज्ञा करतो की पुढील चैत्र नवरात्रीपर्यंत, बस्तरच्या भूमीवरून लाल दहशतीची सावली नाहीशी होईल. हे माझे वचन आहे, दंतेवाडाच्या पवित्र मातीतून मी हे घोषित केले आहे.”
अमित शाह यांनी सांगितले की, बस्तरमध्ये हिंसाचार आणि रक्तपाताचा काळ आता संपला आहे. बस्तरमध्ये पूर्वी गोळ्या झाडल्या जात असत आणि बॉम्बस्फोट होत असत ते दिवस आता संपले आहेत. मी नक्षलवादी बांधवांना शस्त्रे टाकून मुख्य प्रवाहात सामील होण्याचे आवाहन करतो. तुम्ही आमचे आहात. कोणताही नक्षलवादी मारला गेला की कोणालाही आनंद होत नाही. फक्त तुमची शस्त्रे समर्पण करा आणि मुख्य प्रवाहात सामील व्हा, असे ते म्हणाले.
२०२५ मध्ये आतापर्यंत एकूण ५२१ आणि २०२४ मध्ये ८८१ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे, अशी आकडेवारी अमित शाह यांनी सांगितली. ज्या नक्षलवाद्यांना समजले आहे की, विकासासाठी शस्त्रे, आयईडी आणि ग्रेनेडची गरज नाही, तर संगणक आणि पेनची गरज आहे, त्यांनी आत्मसमर्पण केले आहे, असे अमित शाह म्हणाले. केंद्र आणि राज्य सरकार मुख्य प्रवाहात परतणाऱ्यांना पूर्ण संरक्षण आणि पाठिंबा देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“या प्रदेशाला विकासाची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच वर्षांत बस्तरला सर्वकाही देऊ इच्छितात. बस्तरमध्ये गेल्या ५० वर्षांत विकास झालेला नाही. तथापि, हे तेव्हाच होऊ शकते जेव्हा मुले शाळेत जातात, तहसीलमध्ये आरोग्य सुविधा असतात आणि प्रत्येक व्यक्तीकडे आधार कार्ड, रेशन कार्ड आणि आरोग्य विमा असतो,” असे अमित शाह म्हणाले. बस्तरचे लोक जेव्हा त्यांची घरे आणि गावे नक्षलमुक्त करण्याचा निर्णय घेतील तेव्हाच विकास होऊ शकतो, असेही अमित शाह म्हणाले.
हे ही वाचा..
त्यात बुचकळ्यात टाकणारे आहे तरी काय?
“भारताच्या ‘शेजारी प्रथम’ धोरणात श्रीलंकेचे विशेष स्थान”
‘श्रीलंका आपल्या भूभागाचा भारताविरुद्ध वापर करू देणार नाही!’
यावेळी गृहमंत्र्यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई आणि उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांच्या नक्षलवादाशी लढण्यासाठी आणि आदिवासी समुदायांना पाठिंबा देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास मदत करणाऱ्या आणि स्वतःला माओवादमुक्त घोषित करणाऱ्या प्रत्येक गावाला १ कोटी रुपयांचे बांधकाम देण्याच्या राज्य सरकारने केलेल्या घोषणेवर त्यांनी प्रकाश टाकला. अमित शाह म्हणाले की, बस्तर आता नक्षलवादासाठी नाही तर त्याच्या समृद्ध लोक परंपरा, आदिवासी वारसा आणि प्रगतीसाठी ओळखले जाईल.