तब्बल २८ वर्षे नक्षलवाद्यांसोबत जंगलात दिवस कंठणाऱ्या कोला तुमरेटी उर्फ गिरधर याने आत्मसमर्पण केले. देवेंद्र फडणवीस आणि पोलिस अधिकाऱ्यांसमोर या नक्षलवाद्यांच्या सेनापतीने आत्मसमर्पण केल्यानंतर त्याने आपल्या या चळवळीतील सहभागाविषयी आणि चळवळीच्या सद्यस्थितीविषयी प्रथमच भाष्य केले. त्यातून नक्षलवादाचा कणा पुरता मोडला गेल्याचे समोर आले. गिरधर याने जून महिन्यात फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केले होते.
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी एका मुलाखतीत सांगितले की, २०२६पर्यंत देशातील नक्षलवाद पूर्णपणे संपुष्टात येईल. त्याची प्रचीती गिरधर याच्या विधानावरून आली. गिरधरने एका मुलाखतीत सांगितले की, गडचिरोली आणि महाराष्ट्रातील नक्षलवादाची कंबर ढिली झाली आहे. स्थानिक नागरिकांनी नक्षलवाद्यांना मदत करणे बंद केले आहे. त्यांना विकास हवा आहे. बंदूक नको. गेल्या पाच वर्षात तर आम्ही एकाही व्यक्तीला नक्षल दलममधये भर्ती करू शकलो नाही, असे गिरधर म्हणाला. गिरधरने हेदेखील सांगितले की, बंदुकीचा मार्ग सर्वस्वी चुकीचा आहे आणि संविधानच गोरगरिबांचे रक्षण करू शकतो. त्यामुळे लोकशाहीचा मार्गच योग्य आहे.
हे ही वाचा:
बांगलादेशांत काली माता मंदिराची तोडफोड
अमित शाहांच्या अध्यक्षतेखाली १९ डिसेंबरला होणार उच्चस्तरीय सुरक्षा बैठक
‘राम मंदिर बांधणाऱ्यांचा सन्मान झाला, ताजमहाल बांधणाऱ्यांचे हात कापले गेले’
जन्मशताब्दी ‘चित्रसृष्टीनाथा’ची
नक्षलवाद्यांचा प्रमुख राहिलेल्या गिरधरने केलेल्या या विधानामुळे नक्षलवादाच्या चळवळीचे भवितव्य काय याचे उत्तर मिळते आहे. गिरधरने १६व्या वर्षी नक्षलवादी बनण्याचे ठरविले होते. तो गडचिरोली जिल्ह्यात कमांडर होता. शिवाय, नक्षलवाद्यांच्या राजकीय आणि सामाजिक प्रचाराचा प्रमुखही होता. काही दिवसांपूर्वी गिरधरने फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केले.
त्याने सांगितले की, मी आजपर्यंत चुकीच्या मार्गाने जात होतो, आता योग्य मार्गावर आलो आहे. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात आता नव्या योजना येत आहेत आणि लोकांनाही आता हाच विकास हवा आहे. मोठ्या प्रकल्पातून स्थानिकांना रोजगार मिळत असल्याचे दिसते आहे. त्यामुळे स्थानिकांनी बंदुकीचा मार्ग योग्य की शांततेचा मार्ग योग्य हे ठरवावे. जर आत्मसमर्पणाची संधी मिळाली तर तिचा फायदा उठवा. संविधानाचा मार्ग योग्य आहे, त्याशिवाय दुसरा मार्ग नाही. कोणत्याही अडचणीत संविधानच आपल्याला मार्ग दाखवेल. अनेक वर्षे आम्ही या चळवळीच्या माध्यमातून हत्या केल्या, पण या चळवळीला आता भवितव्य नाही. लोक नक्षलवादी चळवळीपासून दूर जात आहेत.