छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ला, सीआरपीएफचे दोन जवान हुतात्मा!

सुकमाचे एसपी किरण चव्हाण यांनी दिली माहिती

छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ला, सीआरपीएफचे दोन जवान हुतात्मा!

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात रविवारी(२३ जून) नक्षलवाद्यांनी केलेल्या इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी) स्फोटात सीआरपीएफचे दोन जवान हुतात्मा झाले आहेत. सैनिकांच्या हालचालीदरम्यान सिल्गर भागात नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून आणला. नक्षलवाद्यांनी जवानांच्या वाहनाला लक्ष्य करून हा स्फोट घडवून आणला. या घटनेत सीआरपीएफचे दोन जवान हुतात्मा झाले असून अनेक जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. सुकमाचे एसपी किरण चव्हाण यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.

याबाबत माहिती देताना एसपी किरण चव्हाण यांनी सांगितले की, सीआरपीएफच्या कमांडो बटालियन फॉर रिझोल्युट ॲक्शन (कोब्रा) २०१ बटालियनचे जवान रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि बाइकवरून नियमित गस्तीवर सिल्गरहून तेकुलागुडेम कॅम्पकडे जात होते. सुरक्षा दलांना हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी कॅम्प सिल्गर ते टेकलगुडेम या मार्गावर आयईडी पेरला होता.

हे ही वाचा:

राज्यातील सर्व आयटीआयमध्ये निर्माण होणार ‘संविधान मंदिर’

ज्ञानवापीचे सर्वेक्षण करू देणाऱ्या न्यायाधीशांच्या हत्येसाठी इस्लामी कट्टरवाद्यांचा कट

धक्कादायक! पुण्यातील नामांकित हॉटेलमध्ये ड्रग्सची विक्री?

बंगालमध्ये दहशतवादी मॉड्युल उद्ध्वस्त

या दरम्यान सुरक्षा जवानांचे वाहन जात असताना नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडीचा स्फोट झाला आणि यामध्ये ट्रक चालक आणि सहचालक जवान हुतात्मा झाले. वाहन चालक विष्णू आर (३५) आणि कॉन्स्टेबल शैलेंद्र (२९) अशी हुतात्म्यांची नावे आहेत. इतर सर्व सैनिक सुरक्षित आहेत. जवानांचे पार्थिव घटनास्थळावरून बाहेर काढण्यात येत असून शोध मोहीम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, सीआरपीएफ आणि डीआरजीच्या टीमने आज (२३ जून) सुकमाच्या जंगलात कारवाई करत नक्षलवाद्यांनी तयार केलेल्या बनावट नोटा आणि प्रिंटर मशीन जप्त केल्या आहेत. याशिवाय शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. गावकऱ्यांना फसवून नक्षलवादी बनावट नोटा बाजारात आणत होते. सुरक्षा दलाला माहिती मिळताच सुकमाच्या कोरागुडा भागात शोधमोहीम राबवली. या छापेमारी दरम्यान सुरक्षा दलाला १००, २०० आणि ५०० ​​रुपयांच्या बनावट नोटा आणि प्रिंटर मशीनही सापडले आहेत.

Exit mobile version