२१ फेब्रुवारी १९९९मध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यात शिखर परिषदेनंतर लाहोर करारावर स्वाक्षरी झाली होती. करारानंतर दोन्ही देशांदरम्यान शांतता आणि स्थैर्य स्थापन करण्याची ग्वाही देण्यात आली होती. मात्र काहीच महिन्यानंतर पाकिस्तानने घुसखोरी केली आणि कारगिल युद्ध झाले. ‘आम्ही या कराराचे उल्लंघन केले.
ती आमची चूक होती,’ अशी कबुली माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी दिली आहे. पीएमएल-एनच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी हा कबुलीजबाब दिला.२८ मे १९९८मध्ये पाकिस्तानने पाच अणुचाचण्या केल्या होत्या. त्यानंतर २१ फेब्रुवारी १९९९मध्ये तत्कालीन पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी पाकिस्तानात गेले होते आणि शिखर परिषदेनंतर लाहोर करारावर स्वाक्षरी केली होती.
हे ही वाचा:
पंजाबमध्ये ईडीची मोठी कारवाई, ड्रग्ज प्रकरणी १३ ठिकाणी छापे, ३ कोटी रुपये जप्त!
केजरीवाल २ जून रोजी पुन्हा तुरुंगात; सर्वोच्च न्यायालयाने दिला दणका!
पुणे पोलिसांकडून ससूनच्या डॉ. अजय तावरेच्या घराची झडती
नवाझ शरीफ यांच्याकडून इम्रान खान लक्ष्य
अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी पाकिस्तानचा आण्विक कार्यक्रम रोखण्यासाठी पाच अब्ज डॉलर देऊ केले होते, असा दावा नवाझ शरीफ यांनी केला आहे. ‘मी हा प्रस्ताव फेटाळून लावला. मात्र माझ्या जागी माजी पंतप्रधान इम्रान खान असते, तर त्यांनी क्लिंटन यांचा प्रस्ताव नक्कीच स्वीकारला असता,’ अशी टीकाही त्यांनी केली. सन २०१७मध्ये पाकिस्तानचे मुख्य न्यायाधीश साकिब निसार यांच्या द्वारे खोट्या केसमध्ये अडकवून आपल्याला पंतप्रधानपदावरून हटवण्यात आले, असा दावा शरीफ यांनी केला. त्यांच्या विरोधातील सर्व प्रकरणे खोटी होती. तर, पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय)चे संस्थापक इम्रान खान यांच्यावरील सर्व आरोप योग्य आहेत, असेही ते म्हणाले.