उत्तर प्रदेशातील कन्नौजमध्ये एका किशोरवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली नवाब सिंह यादव यांना अटक करण्यात आली होती. नवाब सिंह यादव हे सपाचे पक्षप्रमुख अखिलेश यादव यांचे निकटवर्तीय मानले जातात. नवाब सिंह यादवच्या गुन्हेगारी कुंडलीचा पोलिसांनी तपास सुरू केला असून पोलिसांनी आतापर्यंत नोंदवलेल्या विविध गुन्ह्यांची यादी जाहीर केली. यामध्ये बंडखोरी, दरोडा, मारहाण आणि फसवणुकीच्या गुन्ह्यांचा समावेश असून या सर्व गुन्ह्यांच्या नोंदी सदर आणि तिरवा पोलीस ठाण्यात नमूद आहेत.
कन्नौज जिल्ह्यात दबदबा असणाऱ्या नवाबसिंग यादव यांच्या अटकेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून भाजपने समाजवादी पार्टीवर हल्लाबोल करत जोरदार टीका केली आहे. याच दरम्यान या प्रकरणावरून समाजवादी पक्षाने हात झटकले आहेत. रविवारी रात्री नवाब सिंह यादवला ताब्यात घेतल्यानंतर सोमवारी (१२ ऑगस्ट) दुपारी न्यायालयात हजर केले असता सायंकाळी त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली.
दरम्यान, पोलिसांनी नवाबसिंग यादववर दाखल झालेल्या सर्व गुन्ह्यांची यादी जाहीर केली आहे. आधीच नोंदवलेल्या १५ गुन्ह्यांव्यतिरिक्त, यामध्ये रविवारी रात्री दाखल झालेल्या १६ व्या गुन्ह्याचाही समावेश आहे.नवाबसिंग यादव याच्याविरुद्ध सदर कोतवाली येथे दंगल, दरोडा, फसवणूक, अपहरण, सरकारी मालमत्तेचे नुकसान, गुंडगिरी, खुनी हल्ला, मारहाण, विनयभंग आणि पॉक्सो कायद्यानुसार गुन्हे दाखल आहेत.
हे ही वाचा:
शेख हसीना भारतात राहिल्याने द्विपक्षीय संबंधांना धक्का पोहोचणार नाही !
प्रमोद भगत पॅरिस २०२४ पॅरालिम्पिकला मुकणार; १८ महिन्यांसाठी निलंबित
जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या नऊ जणांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
बांगलादेशमधील अराजकतेचा परिणाम नागपूरच्या संत्र्यांवर? निर्यात रखडली
एकेकाळी दबदबा होता, आता सपाने अंतर राखले
सपाचे मजबूत नेते आणि पक्षप्रमुख अखिलेश यादव यांचे निकटवर्तीय अशी नवाब सिंह यादव यांची एकेकाळी ओळख आणि दबदबा होता. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत तिरवा विधानसभा मतदारसंघातून तिकीटाची मागणी पूर्ण न झाल्याने नवाब सिंह यादव यांनी नाराजी व्यक्त केली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत डिंपल यादव येथून पराभूत झाल्याने नवाबसिंग यादव यांच्यावर खापर फोडण्यात आले. त्यानंतर समाजवादी पार्टीने नवाबसिंग यादव यांच्याशी पूर्णपणे अंतर राखले होते. मात्र, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जेव्हा अखिलेश यादव स्वतः येथून लढले होते, तेव्हा नवाब सिंह यादव यांनी त्यांचा प्रचार केला होता. परंतु, आताच्या घडलेल्या प्रकरणावर पक्षाने हात झटकले आहे. पक्षाने स्पष्ट सांगितले की, नवाब सिंह यादव पक्षाच्या सदस्य नाही. तसेच तो पक्षाच्या कोणत्याही कार्यात सहभागी होत नव्हता.